खरा सनातन धर्म कोणता?
   

आज चालू असलेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळीच्या दंगलीत सुधारक म्हणजे जो सनातन धर्माचा उच्छेद करू पाहतो तो, अशी "सनातनी' म्हणाविणार्‍या पक्षाच्या परिभाषेत सुधारक या शब्दाची परिभाषा ठरून गेली आहेसे दिसते. लोकांसही लहापणापासून सनातन म्हणजे जीविरुद्ध ब्रही न काढता ती शिरसादंद्य मानणे हे धार्मिक कर्तव्य आहे अशी आज्ञा वा रुढि होय असे समजण्याची सवय लागून गेलेली असल्यामुळे एखादी रुढि व्यवहारात अगदी ढळढळीतपणे हानिकारक होत आहे हे कळत असताही ती सनातन आहे इतके म्हणताच ती मोडण्याचे त्यांच्या जिवावर येते आणि ती मोडू पाहणारा सुधारक काहीतरी अपवित्र, धर्माविरुद्ध अकर्म करू निघाला आहे. असा त्यांचा एक पूर्वग्रह सहजच होऊन बसे. लोकसमाजाचा हा पूर्वग्रह दूर करण्यासाठी आणि अयोग्य आहे हे दोघांच्याही स्पष्टपणे ध्यानात यावे म्हणून या वादग्रस्त प्रकरणातील "सनातन धर्म' ह्या दोन मुख्य शब्दांचा अर्थच प्रथम निश्चित करणे आवश्यक झालेले आहे. नुसते हा सनातनी आणि तो सुधारक असे ओरडत राहण्यात काही अर्थ नाही. आम्ही स्वत:स सनातन धर्माचे अभिमानी समजतो आणि कित्येक सनातनी आपल्या आचरणाने पुष्कळ सुधारणास उचलून धरताना आढळतात. अशा गोंधळास सनातन धर्म म्हणजे काय ठरविली तरी अनेक मतभेद नाहीसे होण्याचा आणि जे राहतील ते का, कोणाच्या अर्थी उरतात ते उभयपक्षांच्या स्पष्टपणे ध्यानात येण्याचा बराच संभव आहे. यास्तव या लेखात आम्ही सनातन धर्म ह्या शब्दास काय अर्थी योजतो, त्या कोणच्या अर्थी धर्म आम्हास सनातन या पदवीस योग्य वाटतो ते थोडक्यात नि:संदिग्धपणे सांगणार आहोत.
ज्या अर्थी आज ते शब्द योजले जातात ते अर्थ इतके विविध, विसंगत नि परस्परविरुद्धही असतात की, ते आहेत तसेच स्वीकारणे अगदी अयुक्त व्हावे. श्रुति-स्मृतिपासून तो शनिमहात्म्यापर्यंतच्या सार्‍या पोथ्या आणि वेदांच्या अपौरुषयत्वापासून तो वांग्याच्या अभक्ष्यत्वापर्यंतचे सारे सिद्धान्त सनातन धर्म या एकाच पदवीस पोचलेले आहेत. उपनिषदांतील परब्रह्म स्वरूपाचे अत्युदार विचार हेही सनातन धर्मच आणि विस्तवापुढे पाय धरून शेकू नये, कोवळ्या उन्हात बसू नये, लोखंडाचा विक्रय करणार्‍यांचे अन्न कदापि खाऊ नये, रोगचिकित्सक वैद्यभूषणाचे अन्न तर घावातील पुवाप्रमारे असून सावकारी करणार्‍या, व्याजबुट्टा घेणार्‍या गृहस्थांचे अन्न विष्ठेप्रमाणे असल्यामुळे त्याच्या घरी वा सांगाती केव्हाही जेऊ नये (मनू. ४-२२०); गोरसाचा खरवस, तांदुळाची खीर, वडे, घारगे आणि निषिद्ध असून लसूण, कांदा आणि गाजर खाल्ल्याने तर द्विज तत्काल पतित होतो (पतेद्‌द्वि: ! मनु ५-१९); परंतु श्राद्धनिमित्त केलेले मांस जो कोणी हट्टाने खात नाही तो अभागी एकवीस जन्म पशुयोनि पावतो. (मनु ५-३५) "नियुक्तस्तु यथान्याय यो मांस नात्ति मानव: । स प्रेत्य पशुता याति भातापेक्षा ब्राह्मणास वराहाचे वा महिषाचे मांस जेऊ घालणे उत्तम, कारर पितर त्या मांसाच्या भोजनाने दहा महिने तृप्त राहतात आणि वार्ध्रीणस बोकडाचे मांस ब्राह्मणांनी जर का खाल्ले तर भरभक्कम बारा वर्षेपर्यंत पितरांचे पोट भरलेले राहते- "वार्ध्रीणसस्य मांसेन तृप्तिद्वदिशवार्षिकी!' (मनु ३, २७१) हाहि सनातन धर्मच; आणि कोणच्याही प्रकारचे मांस खाऊ नये, "निवर्तेत सर्वमांसस्य भक्षणात्‌!' मांसाशनास्तव प्राणिवधास नुसते अनुमोदिणारा देखील "घातक' महापापी होय. (मनु ५, ४९-५१) हाही सनातन धर्मच! तोंडाने अग्नि फुंकू नये, इंद्रधनुष्य पाहू नये, "नाश्नीयाद्‌भार्यया साधम्‌' स्त्रीसह जेऊ नये, तीला जेवतान बघू नये, दिवसा मलमुत्रोत्सर्ग उत्तराभिमुखच करावे, पण रात्री दक्षिणाभिमुख (मनु ४-४३) इत्यादी हे सारे विधिनिषेध तितकेच मननीय सनातन धर्म होत की, जितके "संतोषे परमास्थाय सुखार्थी संयतो भवेत्‌, संतोषमूल हि सुख दु:खमूल विपर्यय: । (मनू ४-१२) प्रभूति उदात्त उपदेश हे मननीय सनातन धर्म आहेत!!
ह्या अनेक प्रसंगी अगदी परस्परविरुद्ध असणार्‍या विधिनिषधांस आणि सिद्धान्तास सनातन धर्म हाच शब्द लुंगेसुंगे भाबडे लोकच लावतात असे नसून आपल्या सार्‍या स्मृतिपुराणातील सनातन धर्मग्रंथातूनच ही परंपरा पाडलेली आहे. वरील प्रकारच्या सार्‍या मोठ्या, धाकट्या, व्यापक, विक्षिप्त, शतावधानी, क्षणिक आचारविचारांच्या अनुष्टुपाच्या अंती अगदी ठसठशीतपणे ही एकच राजमुद्रा बहुधा ठोकून दिलेली असते की, "एष धर्मस्सानातन:!'
आपल्या धर्मग्रंथातच ही अशी खिचडी झालेली नसून जगातील इतर झाडून सार्‍या अपौरुषेय म्हणविणार्‍या प्राचीन आणि अर्वाचीन धर्मग्रंथांचीही तीच स्थिति आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या मोसेस पैगंबरापासून तो अगदी आजकालच्या अमेरिकेतील मोहंमद पैगंबरापर्यंत सर्वांनी, मनुष्याच्या उठण्याबसण्यापसून, दाढी-मिशा-शेंडीच्या लांबीरुंदीपासून, वारसांच्या, दत्तकांच्या लग्नाच्या निर्बंधापासून तो देवाच्या स्वरूपापर्यंत आपल्या सार्‍या विधानांवर "एष धर्मस्सनातन:' हीच राजमद्रा आणि तीही देवांच्या नावाने ठोकलेली आहे! हे सारे विधिनिषेध देवाने सार्‍या मानवांसाठी अपरिवर्तनीय धर्म म्हणून सांगितले आहेत! सर्व मानवांनी सुंता केलीच पाहिजे हाही सनातन धर्म आणि त्रैवर्णिकांनी तसे भलतेसलते काहीएक न करता मुंजच करावी हाही सनातन धर्मच! लाक्षणिक अर्थीच नव्हे तर अक्षरश: ह्या सार्‍या अपौरुषय, ईश्वरी धर्मग्रंथात एकाचे तोंड पूर्वेस तर एकाचे पश्चिमेस वळलेले आहे! आणि तेही अगदी प्रार्थनेच्या पहिल्या पावलीच! सकाळीच पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना करणे हाही सनातन धर्म आणि सकाळी देखील प्रार्थना म्हटली की ती पश्चिमेकडेच तोंड करून केली पाहिजे हाही मनुष्यमात्राचा सनातन धर्मच! एकाच देवाने मनूला ती पहिली आज्ञा दिली अन् महंमदाला ही दुसरी दिली! देवाची अगाध लीला; राखून दुरून मौज पहात बसण्याचा आरोप शौकतअल्लीवर उगीच करण्यात येतो. हा खेळ चालू करण्याचा पहिला मान त्यांचा नसून असे अगदी परस्परविरुद्ध प्रकार अपरिवर्तनीय सनातन धर्म म्हणून त्या दोघांसही सांगून त्यांची झूंज लावून देणार्‍या गमती स्वभावाच्या देवाचाच तो मान आहे! ही मूळची त्याची लीला ! आणि त्याची नसेल तर त्याच्या नावावर हे ग्रंथ चापून लादून देणार्‍या मनुष्याच्या मूर्ख श्रद्धेची!
सारे रोम जळत असताना सारंगी वाजवीत ती गंमत पाहणारा असा देवाला कोणी नीरो समजण्यापेक्षा मानवी मूर्खपणावरच वरील विसंगतीचा दोष लादणे आम्हास तरी अधिक सयुक्ति वाटते. या सार्‍या विसंगत आणि परस्परविरुद्ध गोष्टीस सब घोडे बारा टक्के भावाने "सनातन धर्म' ही एकच पदवी देण्यास मानवी बुद्धिच चुकली आहे. सनातन धर्म ह्या शब्दांचा हा रूढ अर्थच ह्या विसंवादाला कारण झाला आहे, आणि त्या शब्दांच्या मूळ अर्थाची छाननी करून त्याला संवादी असणार्‍या गोष्टीसच तो शब्द लावीत गेल्याने ह्या मतामतांच्या गलबल्यात खरा सनातन धर्म कोणता ते निश्चयपूर्वक नि पुष्कळ अंशी नि:संदेहपणे सांगता येते अशी आमची धारणा आहे. त्या शब्दांच्या अर्थाची ती छाननी अशी:
सनातन शब्दाचा मुख्य अर्थ शाश्वत, अबाधित, अखंडनीय, अपरिवर्तनीय धर्म हा शब्द, इंग्लिश "लॉ' ह्या शब्दाप्रमाणेच आणि तसाच मानसिक प्रक्रियेमुळे पुष्कळ अर्थांतरे घेत आला आहे.
(अ) प्रथम त्याचा मूळचा व्यापक अर्थ नियम कोणत्याही वस्तूच्या अस्तित्वाचे नि व्यवहाराचे जो धारण, नियमन करतो तो त्या वस्तूचा धर्म. पाण्याचे धर्म, अग्नीचे धर्म प्रभृति त्यांचे उपयोग ह्या व्यापक अर्थीच होतात. सृष्टिनियमांस "लॉ' शब्दही लावतातच, जसे "लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.'
(आ) ह्याच व्यापक अर्थामुळे पारलौकिक आणि पारमार्थिक पदार्थांच्या नियमांसही धर्मच म्हणण्यात येऊ लागले. मग ते नियम प्रत्यक्षागत असोत वा तसे भासोत! स्वर्ग, नरक, पुर्वजन्म, पुनर्जन्म, ईश्वर, जीव, जगत्‌यांचे परस्परसंबंध, ह्या सार्‍यांचा समावेश धर्म ह्या शब्दातच केला गेला. इतकेच नव्हे तर हळूहळू तो धर्म शब्द या त्याच्या पारलौकिक विभागार्थच विशेषेकरून राखून ठेवल्यासारखा झाला. आज धर्म शब्दाचा विशेष अर्थ असा हाच होतो, की या अर्थी धर्म म्हणजे "रिलिजन'.
(इ) मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार वरील पारलौकिक जगतात त्यास उपकारक ठरतील वाटले, त्या पारलौकिक जीवनात त्याचे धारण करतील असे भासले, तेही धर्मच मानण्यात आले. इंग्लिशमध्ये मोसेस, अब्राहाम, महंमद प्रभृति पैगंबरांच्या स्मृतीतही अशाच खच्चून असलेल्या सार्‍या कर्मकांडास "लॉ'च म्हटले आहे. या अर्थी धर्म म्हणचे आचार.
(उ) शेवटी वरील आचार वगळून मनुष्यामनुष्यांतील जे केवळ ऐहिक प्रकरणीचे व्यवहार असतात त्या व्यक्तीच्या वा राष्ट्राच्या वर्तननियमांसही पूर्वी धर्मच म्हणत. स्मृतीत युद्धनीति, राजधर्म, व्यवहारधर्म प्रभूति प्रकरणातून हे गोवलेले असतात. पण आज यांपैकी पुष्कळसा भाग स्मृतिनिष्ठ अपरिवर्तनीय धर्मसत्तेतून निघून आपल्या इकडेही परिवर्तनीय मनुष्यकृत नियमांच्या कक्षेत, शास्त्रीपंडितांनाही निषिद्ध न वाटावा इतक्या निर्विवादपणे समाविष्य झालेला आहे. जसे गाडी हाकण्याचे निर्बंध, शिवीगाळ, चोरी, इत्यादीकांचे दंडविधान तो निर्बंधशासनाचा (कायदेशासनाचा) प्रदेश होय. आपल्या इकडे धर्म शब्द आज जसा "रिलिजन' ह्या विशेषार्थी राखीव झाला आहे. तसाच इंग्लिशमध्ये "लॉ' हा शब्द विशेषार्थी ह्या निर्बंधशासनास आज वाहिला जात आहे. ह्या प्रकरणी धर्म म्हणजे निर्बंध (कायदा"लॉ ”).
या लेखास अवश्य तेवढा सनातन आणि धर्म ह्या शब्दांच्या अर्थाचा उलगडा असा केल्यानंतर आता धर्म शब्दांच्या या वरील विभागांपैकी कोणत्या निभागास सनातन हा शब्द यथार्थपणे लावता येईल हे ठरविणे फारसे अवघड जाणार नाही. सनातन धर्म ह्याचा वर दाखवल्याप्रमाणे आमच्यापुरता तरी आम्ही निश्चित केलेला अर्थ म्हणजे शाश्वत नियम, अपरिवर्तनीय, जे बदलू नयेत इतकेच नव्हे तर जे बदलणे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे असे अबाधित जे धर्म असतील, नियम असतील, त्यासच सनातन धर्म ही पदवी यथार्थपणे देता येईल. हे लक्षण वर धर्माचा जो पहिला विभाग पाडलेला आहे त्या सृष्टिनियमांस तंतोतंत लागू पडते. प्रत्यक्ष अनुमान आणि त्यांना सर्वस्वी विरुद्ध न जाणारे आप्तवाक्य या प्रमाणांच्या आधारे सिद्ध होऊ शकणारे आणि ज्याविषयी कोणीही यथाशास्त्र प्रयोग केला असता त्या कार्यकारणभावाच्या कसोटीस जे पूर्णपणे केव्हाही उतरु शकतात असे मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यात जे जे सृष्यिनियम आणि जी जी वैज्ञानिक सत्ये आज आलेली आहेत त्यास त्यासच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो. नि:शेष परिगणानास्तव नव्हे तर दिग्दर्शनार्थ म्हणून खालील नामोल्लेख पुरे आहेत. प्रकाश, उष्णता, गति, गणित, गणितज्योषि, ध्वनि, विद्युत, चुंबक, रेडियम, भूगर्भ, शरीर, वैद्यक, यंत्र, शिल्प, वानस्पत्य जैन, आणि मनुष्यजातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म होय. ते नियम आर्यांसाठी वा अनार्यांसाठी, मुस्लिमांसाठी वा काफरांसाठी, इस्त्रलियांसाठी वा हीदनांसाठी अवतीर्ण झालेले नसून ते सर्व मनुष्यमात्रास नि:पक्षपाती समानतेने लागू आहेत. हा खरा सनातन धर्म आहे. इतकेच नव्हे तर हा खरोखर मानवधर्म आहे. हा केवळ "कृते तु मानवो धर्म:' नाही तर त्रिकालाबाधित मानवधर्म आहे; म्हणूनच त्यास सनातन हे विशेषण निर्विवादपणे लागू पडते. सूर्य, चंद्र, आप, तेज, वायु, अग्नि, भूमि, समूद्र प्रभूति पदार्थ ह्या, कोणी लोभाच्या लहरीप्रमाणे प्रसन्न वा रुष्य होणार्‍या देवता नसून ह्या आमच्या सनातन धर्माच्या नियमांनी पूर्णपणे बद्ध असणार्‍या वस्तु आहेत. ते नियम जर आणि ज्या प्रमाणात मनुष्यास हस्तगत करता येतील तर आणि त्या प्रमाणात ह्या सर्व सृष्टिशक्तींशी त्याला रोखठोक आणि बिनचूक व्यवहार करता आलात पाहिजे-करता येतोही. भर महासागरात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणन जरी त्या समुद्रास प्रसादविण्यास्तव नारळांचे ढीग त्यात फेकले आणि अगदी शुद्ध वैदिक मंत्रात जरी टाहो फोडला की "तस्मा अरं गमाव वो यस्य क्षयाय जिन्वथ । आपो जनयथा चन: ' तरी तो समुद्र आमच्या "जनां' सह त्या नावेस बुडविल्यावाचून हजारात नउशे नव्याण्णव प्रसंगी राहत नाही, आणि जर त्या नावेस वैज्ञानिक नियमांनुसार ठाकठीक करून, पोलादी पत्र्यांनी मढवून "बेडर' बनवून सोडली तर तिच्यावर वेदांची होळी करून शेकणारे आणि पंचमहापुण्ये समजून दारू पीत, गोमांस खात, मस्त झालेले रावणाचे राक्षस जरी चढेलेले असले तरी त्या बेडर रणनावेस हजारांत नउशे नव्याण्णव प्रसंगी समुद्र बुडवीत नाही; बुडवू शकत नाही. तिला वाटेल त्या सुवर्णभूमीवर तोफांचा भडिमार करण्यासाठी सुखरूपपणे वाहून नेतो! जी गोष्ट समुद्राची तीच इतर महद्‌भूतांची. त्यास माणसाळविण्याचे महामंत्र शब्दनिष्ठ वेदांत वा झेंदावेस्तात, कुराणात वा पुराणात सापडणारे नसून प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानात (सायन्समध्ये) सापडणारे आहेत. हा सनातन धर्म इतका पक्का सनातन, इतका स्वयंसिद्ध नि सर्वस्वी अपरिवर्तनीय आहे की, तो बुडू नये, परिवर्तन पावू नये, म्हणून कोणताही सनातन धर्मसंरक्षक-संघ स्थापण्याची तसदी कलियुगात देखील घ्यावयास नको. कारण या वैज्ञानिक सनातन धर्मास बदलविण्याचे सामर्थ्य मनुष्यास कोणासही आणि कधीही येणे शक्य नाही.
ही गोष्ट आम्ही जाणून आहोत की, हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम, संपूर्णपणे मनुष्याला आज अवगत नाहीत-बहुधा केव्हाही तसे अवगत होणार नाहीत. जे आज अवगत आहेसे वाटते त्याविषयीचे आमचे ज्ञान विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडे चुकलेलेही आढळेल; आणि अनेक नवीन नवीन नियमांच्या ज्ञानाची भर तर त्यात निश्चितपणे पडेल. जेव्हा जेव्हा ती भर पडेल वा तीत सुधारणा करावी लागेल तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, ना लपविता किंवा आजच्या श्लोकांच्या अर्थांची अप्रामाणिक ओढाताण न करता नवीन श्लोक प्रकटपणे घालून ती सुधारणा घडवून आणू, आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू.
आम्ही स्मृतीस सनातन, अपरिवर्तनीय, समजत नाही तर सत्यास सनातन समजतो, अपरिवर्तनीय समजतो. स्मृति बदलाव्या लागतील म्हणून सत्यास नाकारणे हे घर वाढवावे लागले म्हणून मुलांमाणसांचीच कत्तल करण्यासारखे वेडेपणाचे आहे.
धर्म या शब्दाच्या पहिल्या विभागात मोडणार्‍या सृष्टिधर्मास सनातन हे विशेषण पूर्ण यथार्थतेने लागू शकते हे वर सांगितले. आता त्या धर्म शब्दाचा जो दुसरा विभाग आम्ही वर पाडला आहे त्य पारलौकिक आणि पारमार्थिक नियमांचा विचार करू. या प्रकरणासच आज सनातन धर्म हा शब्द विशेषत: लावण्यात येतो. ईश्वर, जीव, जगत यांच्या स्वरूपाचे नि परस्परसंबंधाचे अस्तिरूप किंवा नास्तिरूप काही त्रिकालाबाधित नियम असलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे जन्ममृत्यु, पूर्वजन्म, स्वर्गनरक यांविषयीही जी कोणची वस्तुस्थिती असेल ती निश्चितपणे सांगणारे ज्ञानही त्रिकालबाथित म्हणवून घेण्यास पात्र असणारच. यास्तव या पारलौकिक प्रकरणींचे सिद्धान्तही सनातन धर्म म्हणजे शाश्वत, अपिवर्तनीय धर्म होत यात शंका नाही.
परंतु त्या प्रकरणी जी माहिती नि नियम मनुष्यजातीच्या हाती आज असलेल्या यच्चयावत्‌धर्मग्रंथातून दिलेले आढळतात, त्यातील एकासही सनातन धर्म, अपरिवर्तनीय, निश्चीत सिद्धान्त असे म्हणता येत नाही. निश्चित झालेल्या वैज्ञानिक नियमाप्रमाणे धर्मग्रंथातील हे पारलौकिक वस्तुस्थितींचे वर्णन प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगांच्या कसोटीस मुळीच उतरलेले नाही. त्यांची सारी भिस्त बोलूनचालून एकट्या शब्दप्रामाण्यावर, आप्तवाक्यावर, विशिष्ट व्यक्तींच्या आंतर अनुभूतीवर अवलंबून असते. त्यातही फारसे बिघडले नसते. कारण काही मर्यादेपर्यंत प्रत्यक्षानुमानिक प्रमाणास अविरुद्ध असणारे शब्दप्रमाण, आप्तवाक्य, हेही एक प्रमाण आहेच आहे. पण केवळ या प्रमाणाच्या कसोटीस देखील या धर्मग्रंथातील पारलौकिक विधान लवलेशही उतरत नाही. प्रथम आप्त कोण? -तर आमच्या इकडेच धर्मग्रंथच म्हणतात की, चित्तशुद्धीने सत्त्वोदय झालेली ज्ञानी भक्त आणि समाधिसिद्ध योगी चालेल; या पूर्णप्रज्ञ आप्तात शंकराचार्य, रामानुज, मध्व, वल्लभ यांचा तरी समावेश केला पाहिजे ना? महाज्ञानी कपिलमुनि, योगसूत्रकार पतंजलि यांनाही गाळणे अशक्य, उदाहरणार्थ इतके आप्त पुरेत. आप्तवाक्य, शब्दप्रमाण असेल तर ह्यांचा त्या त्या विशिष्ट वस्तुस्थितीचा अनुभव एकच असला पाहिजे. पण पारलौकिक अनुभव एकच असला पाहिजे. पण पारलौकिक आणि पारमार्थिक सत्याचे जे स्वरूप आणि जे नियम ते प्रत्येकी सांगतात ते प्रत्येकी भिन्नच नव्हेत तर बहुधा प्रत्येकी परस्परविरुद्ध असतात! कपिलमुनि सांगणार-पुरुष नि प्रकृति ही दोनच सत्ये आहेत; ईश्वरबीश्वर हम कुछ नही जानते! समाधिसिद्ध पतंजलि सांगतात- "तत्रपुरुषविशेषो ईश्वर:!' शंकराचार्य सांगतात-पुरुष वा पुरुषोत्तम ईश्वर हे मायोपाधिक आणि मायबाधित असून "ब्रह्म सत्य जनन्मिथ्या जीवो ब्रह्मैवनपर:'अद्वैत हेच सत्य! रामानुज सांगतात- साफ चूक आहे; हा प्रच्छन्न बौद्धवाद! विशिष्टाद्वैत हे सत्य! माध्व-वल्लभ म्हणणार, जीव आणि शिव भक्त आणि देव, जड आणि चैतन एक म्हणता तरी कसे? द्वैत हेच सत्य! अशा या महनीय साक्षीदारांच्या स्वानुभूत शब्दांसरशी गोंधळून बुद्धि जर उद्‌गारली-


पाहियले प्रत्यक्षची । कथितो पाहियले त्याला ।
वदति सारे । आप्तचि सारे । मानू कवणाला?।।


तर त्यात तिचा काय दोष? तरी आम्ही या योगसिद्धांच्या साक्षीत त्या परम योगसिद्धाची-त्या तथागत बुद्धाची साक्ष काढली नाही! देवविषयक हा यच्चयावत्‌विधानसमूह त्याच्या समाधिस्थ स्वानुभूतीत निव्वळ "ब्रह्मजाल' म्हणून टाकाऊ ठरला! समाधिमय ज्ञान, स्वानुभूति ही ह्या पारलौकिक वस्तुस्थितीस अबाधित नि विश्वासार्ह प्रमाण कसे होऊ शकत नाही, निदान अजून शकले नाही, ते असे पाहिल्यावर इतके सांगणे पुरे आहे की, शब्दप्रामाण्याचीही स्थिति वरील आप्तप्रमाणासारखीच आहे. अपौरुषेय वेद ज्या कारणासाठी अपौरुषेय मानावे त्याच कारणासाठी तौलिद, इंजिल, बायबल, कुराण, अवेस्ता, स्वर्णग्रंथ-एक का दोन ! जगात जवळ जवळ जे पन्नासएक ग्रंथ तरी आजही ईश्वरदत्त म्हणून प्रख्यात आहेत, तेही सर्व औपरुषेय मानणे भाग पडते. आणि त्या प्रत्येकात देवाने प्रत्येक तदितर अपौरुषेय धर्मग्रंथातील पारलौकिक वस्तुस्थितीच्या दिलेल्या माहितीशी विभिन्न, विसंगत नि विरुद्ध माहिती दिली आहे. वेद सांगतात, स्वर्गाचा इंद्र हाच राजा! पण बायबलाच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपालवाल्यला देखील माहीत नाही. देवपुत्र येशूच्या कंबरेस सार्‍या स्वर्गाची किल्ली! देव नि देवपुत्र दोघे एकच Trinity in Unity, Unity in Trinity! कुराणातील स्वर्गात "ला अल्ला इल्लिला आणि महमंद रसुलल्ला!' तिसरी गोष्ट नाही. रेड इंडियनांच्या स्वर्गात डुकरेच डुकरे, घनदाट जंगले! पण मुस्लिम पुण्यवंतांच्या स्वर्गात असली "नापाक चीज' औषधाला देखील सापडणार नाही! आणि ह्या प्रत्येकाचे म्हणणे हे की, स्वर्ग मी सांगतो तसाच आहे. प्रत्यक्ष देवाने हे सांगितले; नव्हे, महंमदादि पैगंबर तर वर जाऊन, राहून, स्वत: ते पाहून, परत आले नि त्यांनीही तेच सांगितले! तीच स्थिती नरकाची! पुराणात मूर्तिपूजक नि याज्ञिक तर काय, पण यज्ञात मारलेले बोकड देखील स्वर्गातच जातात असा त्यांचा मेल्यानंतरचा पक्का पत्ता दिला आहे. पण कुराण शपथेवर सांगते की, नरकातल्या जागा, कितीही दाटी झाली तरी, जर कोणाकरिता राखून ठेवल्या जात असतील तर त्या ह्या मूर्तिपूजक आणि अग्निपूजक सज्जनांसाठीच होत! मेल्यानंतरचा त्यांचा नक्की पत्ता नरक! शब्दाशब्दांत भरलेली अशी विसंगति कुठवर दाखवावी! हे सारे धर्मग्रंथ अपौरुषेय यास्तव खरे धरावे तरीही त्यात सांगितलेली पारलौकिक वस्तुस्थिति शब्दाप्रमाणेच देखील सिद्धान्तभूत ठरत नाही-अन्योन्यव्याघातात्‌! ते सारे मनुष्यकल्पित म्हणून खोटे मानले तर ती सिद्धान्तभूत ठरत नाहीच नाही- वदतो व्याघातात! आणि काही खोटे मानावे तरीही ते तसे नि हे असे का, हे ठरविण्यास त्यांच्या स्वत:च्या शब्दावाचून दुसरे प्रमाणाच नसल्यामुळे, ती नाहीच- स्वतंत्रप्रमाणाभावात्‌!!
यास्तव प्रत्यक्ष, अनुमान वा शब्द यांपैकी कोणच्याही प्रमाणाने पारलौकिक वस्तुस्थितीचे आज उपलब्ध असलेले वर्णन हे सिद्ध होत नसल्यामुळे त्यास सनातन धर्म त्रिकालाबाधित नि अपरिवर्तनीय सत्य, असे म्हणता येत नाही. तशा कोणत्याही विधेयास तसे सिद्धान्तसकवरूप येता तेही आमच्या सनातन धर्माच्या स्मृतीत गोवले जाईलच; पण आज तरी तो विषयच प्रयोगावस्थेत आहे आणि आप्तांची या अपौरुषेय ग्रंथांचीहि तद्‌विषयक विधाने सिद्धान्त नसून क्लृप्ति (हायपॉथेसीज) आहेत, फार तर सत्याभास आहे; पण सत्य नव्हे! ते जाणण्याचा प्रयत्न यापुढेही व्हावयास पाहिजे, तथापि त्याविषयी शक्य त्या क्लृप्ति योजून ते स्वर्गीय ऋत आणि अनृत प्राप्त करून घेण्यासाठी इतका अतिमानुष प्रयत्न करून, इतक्या दिक्षांना तरी त्यांचा पत्ता लागत नाहीत; ही कृतज्ञ जाणीव येथे व्यक्तविल्यापासून आम्हास पुढचे अक्षर लिहवतच नाही!
शेवटी राहता राहिले धर्माचे शेवटचे दोन अर्थ. आचार आणि निर्बंध. या दोन्ही अर्थी धर्म शब्दास सनातन हे विशेषण लावता येत नाही. मनुष्याचे जे ऐहिक व्यवहार त्याच्या पारलौकिक जीवनास उपकारक आहेत असे समजले जाई, त्यास आम्ही आचार हा शब्द योजतो. अर्थात्‌ वर दर्शविल्याप्रमाणे पारलौकिक जीवनासंबंधी अस्तिपक्षी वा नास्तिपक्षी अजून कोणताही नक्की सिद्धान्त मनुष्यास कळलेला नसल्याने त्याला कोणता नक्की सिद्धान्त मनुष्यास कळलेला नसल्याने त्याला कोणता ऐहिक आचार उपकारक होईल हे ठरविणे अशक्य आहे. हिंदूच्याच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, यहुदी प्रभृति झाडून सार्‍या धर्मग्रंथांतील कर्मकांडाचा पाया असा वाळूच्या ढिगावर उभारलेला आहे. "क्ष' भू हे बेट की गाव, रान की वैराण, पूर्वेस की उत्तरेस, की आहे की नाहीच हेच जिथे निश्चिले गेले नाही तिथे त्या "क्ष' भूमध्ये सुखाने नांदता यावे म्हणून कोणाच्या वाटेने जावे आणि कोणची शिधाशिदोरी तिथे उपयोगी पडेल ह्याचे बारीकसारीक अपरिवर्तनीय नियम ठरविणे किती अनमान धपक्याचे काम! तसेच हे; यास्तव अमुक ऐहिक आचाराने परलोकी अमुक उपयोग होतो असे सांगणार्‍या कोणत्याही नियमास आज तरी सनातन धर्म म्हणजे शाश्वत अपरिवर्तनीय नि अबाधित नियम असे मुळीच म्हणता येणार नाही. बाकी प्रश्न उरला निर्बंधाचा (कायद्याचा); आणि मनुष्यामनुष्यातील शिष्टाचाराचा. यासही स्मृतीत जरी "एष धर्मस्सनातन:' म्हणून म्हटलेले असले पाहिजे. स्मृतीतही सत्यादि युगातील सनातन धर्मांपैकी काही कलिवर्ज म्हणून पुढे त्याज्य ठरविले. म्हणजे काय? त्याचप्रमाणे बहुतेक "एष धर्मस्सनातन:' पुढच्याच अध्यायातून आपद्‌धर्माच्या अनुष्टुपाने खरडून टाकले जातात. म्हणजे काय? म्हणजे हेच की आपद वा संपद्‌प्रसंगी किंवा युगभेदाने परिस्थितिभेद झाला की हे निर्बंध बदलणेच इष्ट होय. अर्थात्‌ते अपरिवर्तनीय सनातन नसून परिवर्तनीय होत. मनूने राजधर्मात युद्धनीतीचा सनातन धर्म म्हणून जो सांगितला त्यात चतुरंग दलाचा सविस्तर उल्लेख आहे; पण तोफखान्याचा वा वैमानिक दळाचा नामनिर्देशही नाही. आणि सैन्याच्या अग्रभागी शौरसेनी लोक असावेत असे जे सांगितले ते मनूच्या काळी हितावह होते म्हणूनच सांगितले असले तरीही ह्या नियमांस अपरिवर्तनीय सनातन धर्म समजून जर आमचे सनातन धर्मसंघ आजही केवल धनुर्धरांना पुढे घालून आणि आठघोडी रथ सजवून एखाद्या युरोपच्या अर्वाचीन महाभारतात शत्रूस थरारविण्यासाठी-अगदी श्रीकृष्णाचा पांचजन्य फुंकीत चालून गेले तर पांचजन्य करीतच त्यांना परत यावे लागेल, हे काय सांगावयास पाहिजे? हिंदूसेनेच्या अग्रभागी मनुनिर्दिष्ट शौरसेनीय प्रभृति सैनिक होते तोवर हिंदूस मुसलमान धूळ चारतच पुढे घुसत आले; पण मनुस्मृतीत ज्यांचे नावगावही नाही ते मराठे, शीख, ते गुरखे जेव्हा हिंदुसेनेच्या अग्रभागी घुसले तेव्हा त्याच मुसलमानास तीच धूळ खावी लागली ! आचार, रूढि, निर्बंध हे सारे मनुष्यामनुष्यातील ऐहिक व्यवहाराचे नियम परिस्थिति पालटेल तसे पालटीतच गेले पाहिजेत. ज्या परिस्थितीत जो अपार वा निर्बंध मनुष्याच्या धारणास आणि उद्धारणास हितप्रद असेल तो त्याचा त्या परिस्थितीतील धर्म, आचार, निर्बंध. "न हिसर्वहित: कश्चिदाचार: संप्रवर्तते । तेनैवान्य: प्रभवति सोऽपरो बाधते पुन: ।। (म. भा. शांतिपर्व.)
सारांश
(१) जे सृष्टिनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होते.
(२)पारलौकिक वस्तुस्थितीचे असे प्रयोगसिद्ध ज्ञान आपणास मुळीच झालेले नाही. यास्तव तो विषय अद्याप प्रयोवस्थेत आहेसे समजून त्याविषयी अस्तिरूप वा नास्तिरूप काहीच मत करून घेणे अयुक्त आहे. त्या पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ति सांगणारे कोणचेही धर्मग्रंथ अपौरुषय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहत. त्यांच्या क्लृप्ति प्रमाणहीन असल्याने त्यास सनातन धर्म, शाश्वर सत्य असे म्हणता येत नाही.
(३) मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीति, रीति, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठा कसोटीनेच ठरविले पाहिजेत, पाळले पाहिजेत, परिवर्तिले पाहिजेत. "परिवर्तिनि संसारे' ते मानवी व्यवहारधर्म सनातन असणेच शक्य नाही, इष्ट नाही. महाभारतामध्ये म्हटले आहे तेच ठीक की, "अत: प्रत्यक्षमार्गेण व्यवहारविधि नयेत्‌।'