हिंदुस्थान
   

'हिंदुस्थान' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

आपल्या देशाचे प्राचीन नाव - सप्तसिंधू वा सिंधू


आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : १९)


सिंधू शब्दाने देशाच्या सीमांचा बोध


संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचा - 'समुद्र रशना' दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २०)


हिंदुस्थान हे देशाचे नाव सर्व नावांत समर्पक


हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २८)


हिंदुस्थान आमची पुण्यभूमी


...ही भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७१ - ७२)


हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही.


चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही. - (१९३९ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५४)


जगाच्या नकाशात हिंदुस्थान चिरंतन खोदून ठेवा


हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे. - (१९३९ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५५)


हिंदुस्थान हिंदूंचाच देश


वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ? - (१९३७ स.सा.वा. ४ : ३३०)