सावरकरांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त रविवार ६ जून १९४३ ला गोवालिया टँक मैदानावर (आत्ताचे ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई) सार्वजनिकरित्या सत्कार करण्यात आला होता. हा सोहळा रँग्लर रघुनाथराव परांजपेंच्या अध्यक्षतेखाली झाला होता. सावरकर पत्नी यमुनाबाई (माई), कन्या प्रभात व पुत्र विश्वाससह समारंभस्थळी पोहोचल्यावर त्यांचे ६१ सुवासिनींनी पारंपारिकपध्दतीने स्वागत केले. सुशोभित गजाने सावरकरांना हार घातला. प्रसिध्द गायक-नट भालचंद्र पेंढारकरांनी ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. हिंदू राष्ट्र दलाच्या स्वयंसेवकांनी सावरकररचित अखिल हिंदू ध्वज गीत गायन केले. ह्यानंतर पेंढारकरांनी सावरकरांच्या आदराप्रीत्यर्थ रचलेले विशेष गीत सादर केले. वीर सावरकर अभिनंदन समितीचे अध्यक्ष राव बहाद्दुर उमाकांत देसाई म्हणाले की, सावरकरांची राजकीय परंपरा प्राचीन आहे व हिंदू समाज सावरकरांच्या नेतृत्वखाली बलशाली होईल. त्यांनी अशीही माहिती दिली की सावरकर थैलीसाठी ५५००० रूपये गोळा करण्यात आले आहेत व असा विश्वास आहे की २५ जूनपर्यंत एकूण रक्कम ६१००० रूपयांपर्यंत पोहोचेल. अध्यक्ष परांजपे म्हणाले की सावरकरांची उपजत बुध्दीमत्ता, प्रखर वक्तृत्व व आकर्षक व्यक्तिमत्व विपुल अनुभवाने व क्रुतीने समृद्ध झाले आहे; परिणामतः ह्यांचे राजकारण अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांनी सावरकरांच्या हिंदूंच्या सैनिकीकरणाच्या प्रयत्नांचे व धर्माचे राजकारणासोबत मिश्रण करणार्या नेत्यांविरोधात उभे राहणार्या त्यांच्या निर्भयतेचे कौतुक केले. ह्यानंतर सरस्वतीबाई कवनीकर, नरीमन, बॅरिस्टर जमनादास मेहता, पंडित चंद्रगुप्त वेदालंकार ह्यांची सावरकरांच्या स्तुती-पर भाषणे झाली. राव बहाद्दुर देसाईंनी मानपत्राचे वाचन केले व अध्यक्ष परांजपेंनी चांदीच्या पेटीत मानपत्र सावरकरांना अर्पण केले. चांदीच्या पेटीत सावरकरांनी मार्सेलिसला १९१० ला पराक्रमी पलायन केलेल्या एस्.एस्. मोरिया आगनावेची प्रतिक्रुती होती व त्यावर 'वक्ता, विद्वान, लेखक, कविवर, थोर हुतात्मा तू | अभिनव भारत मनोरथांचा मूर्त दिव्य केतू' हे शब्द कोरले होते. माई सावरकरांना साडी व शूभसूचक भेटवस्तू प्रदान केल्या. विविध संस्थांनी सावरकरांना भरपूर हार घातले होते. त्यानंतर सावरकरांनी उस्फूर्तपणे तासभर भाषण केले. त्यांनी ह्या समारंभाचे ‘आयुष्यातील संस्मरणीय प्रसंग’ असे वर्णन केले. ह्याव्यतिरिक्त, जीनांचा सर्व अल्पसंख्यांकांच्या वतीने बोलत असल्याचा दावा भंपक आहे असेही सांगितले. पारशी, ज्यू, आंग्ल-भारतीय, ख्रिश्चनांनी देशाच्या फाळणीची मागणी कधीही केली नसल्याचे ठामपणे सांगितले. काही पूर्वास्प्रुश्यांच्या वेगळ्या भूमीची मागणीने भयभीत होण्याचे कारण नसल्याचेही सांगितले. ते म्हणाले की त्यांनी ह्याविषयी डॉ. आंबेडकरांशी ह्याच मूलाधारावर चर्चा केली आहे. ते असे सांगू इच्छित होते की त्या चतुर्थांशाकडून भयभीत होण्याचे कारण नाही. मुसलमानांव्यतिरिक्त कोणीही जीनांच्या बाजूला नाही व तसेच मुसलमानातील काही समुदायाचाही जीनांना पाठींबा नाही. सावरकरांनी हिंदू व इतर मुसलनानेतर अल्पसंख्यांकाच्यावतीने निपक्षपाती नागरिकत्वाची मागणी केली. पाकिस्तानचे संकट टाळावयाचे असेल तर सर्वांनी स्वातंत्र्य व हिंदुस्थानचे अखंडत्व ह्यावर विश्वास ठेवणार्या हिंदू समर्थकालाच पुढील निवडणूकांमध्ये पाठींबा देण्याची शपथ घ्यावयास हवी असे सांगितले.
षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार समारंभाचे चलतचित्र पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा. ह्यात तुम्हाला सावरकरांसोबत त्यांच्या पत्नी माई सावरकर, कन्या प्रभात, पुत्र विश्वास, रँग्लर परांजपे (मिशीमध्ये; सावरकर स्वतःचा हार त्यांच्या गळ्यात घालत आहेत) व राव बहाद्दुर देसाई दिसतील.
सौजन्यः साम्राज्य युध्द संग्रहालय (Courtesy: Imperial War Museum, London)