हिन्दुत्व

हिंदुत्वाचा मूलभूत, रेखीव व तर्कशुद्ध विचार हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अद्वितीय कार्य आहे. ‘हिंदू’ शब्दाची सावरकरांची छंदोबद्ध संस्कृत व्याख्या प्रसिद्ध झाल्यावर स्वामी श्रद्धानंद उद्गारले, “सावरकरांना ही व्याख्या जेव्हा सुचली ती वेळ वैदिक ऋषींना ज्या उषःकाली सूक्ते स्फूरत त्या उषःकालासारखी असावी”. सावरकरकृत ‘हिंदू’ शब्दाची व्याख्या स्वतंत्र भारताच्या संविधानाने अप्रत्यक्षपणे मान्य केली आहे. सावरकरांचे ‘हिंदुत्व’ विषयक लेखन व हिंदूमहासभेला त्यांनी दिलेली सहा अध्यक्षीय भाषणे आजही हिंदुत्व चळवळीचा सैद्धांतिक आधार आहेत. राजकारणाचे हिंदूकरण, हिंदूंचे सैनिकीकरण, हिंदू-मुस्लिम संबंध, शस्त्रसज्जता इ. विषयांवरील त्यांचे विचार आजही कालोचित आहेत. तथापि सावरकर केवळ शुष्क तत्ववेत्ते नव्हते. आत्मविस्मृत हिंदूसमाजात हिंदुत्वाची जाणीव, अखिल हिंदू दृष्टिकोन व आंदोलन उत्पन्न करणे व अखंड हिंदुस्थान राखण्यासाठी भगीरथ प्रयत्न ही आपली जीवित कार्ये सावरकरांनी केली. सन १९२२ ते १९६६ या काळात हिंदुत्वाचे भाष्यकार व हिंदू संघटक या दोन्ही भूमिकांतून त्यांनी कार्य केले.