हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्
   

'हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्


हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो. - (१९३८ हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ३५०)

'हिंदू' शब्दाची उत्पत्ती


... आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. आणि त्या जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू हयाच नावाने ओळखत असत. - (१९२३ हिं.,स.सा.वा. ६ : ५)


हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही


महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले गेल्यापूर्वी हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ४६)


हिंदू शब्दाची व्याख्या


आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
- (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५)
सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४)


हिंदू ह्या दोन अक्षरांत


हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे. - (स.सा.वा.२:४२९)
हिंदुत्व हा एक शब्द नव्हे, तो इतिहास आहे. -(१९२३ हिं., स.सा.वा. ६ : २)


हिंदुत्वाचे स्फुल्लिंग जागृत ठेवा


अग्निहोत्री ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल. - (१९४१ अ.हिं.ल.प.पृ. १४३)


हिंदुधर्म


'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे. - (१९४९ स.सा.वा. ३ : ७१३)


हिंदुधर्मान्तर्गत धर्मांची नावे


बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ६९ )


एक धर्मपुस्तक नाही हेच चांगले


कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल. - (१९३७ हिं.स.प.पृ. ३७)


हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही


हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो. - (१९२७ हिं.प., स.सा.वा. ३ : ४०)


ग्राह्यतम धर्म - हिंदुधर्म


काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय ! - (१९३५ स.सा.वा. ३ : ५७२)
माझे राष्ट्रीयत्वही मानवराष्ट्रात विलीन पावेल
जर मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' इतर सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात मनुष्यमात्रात नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन. - (१९२८ स.सा.वा. ३ : ६४४)


हिंदू शब्दाचा भविष्य काळातील संभाव्य अर्थ


एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ५४)


हिंदुत्वाची परिणती


हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले तीस कोटी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. मनुष्यजातीस ह्या शक्तीस तोंड द्यावे लागेल असा एक दिवस उगवेल. ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत ! - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ९०)