प्रश्नोत्तरे
   

१) सावरकरांचा जन्म कधी झाला ?

२) सावरकरांचे पूर्ण नाव काय ?

३) सावरकरांचे नाव ‘ विनायक ’ का ठेवण्यात आले ?

४) सावरकरांची जात कोणती ?

५) सावरकरांच्या पूर्वजांविषयी माहीती द्या.

६) सावरकरांचे आई-वडिल, काका इत्यादींविषयी माहीती द्या.

७) सावरकरांच्या कोणकोणत्या पुस्तकांवर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती ?

८) रत्नागिरी येथे सावरकरांची आर्थिक स्थिती कशी होती ?

९) सावरकर – गांधी संबंध.

१०) गांधी हत्या प्रकरणी सावरकरांना अटक कशी झाली ?

११) नथूराम गोडसे यांनी हत्येची सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली त्यामुळे सावरकरांची तांत्रिक मुद्यावर सुटका झाली हे खरे आहे का ?

१२) आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांविषयी सावरकरांची भूमिका काय होती ?

१३) सावरकरांनी आत्मचरित्र लिहिले आहे का ?

१४) सावरकर हे अहंकारी होते का ?

१५) सावरकर हे संकुचित वृत्तीचे होते का ?

१६) सावरकर कोणती मार्गदर्शक तत्वे मानत असत ?

१७) सावरकर हे निराश मन:स्थितीत मरण पावले हे खरे आहे काय ?

१८) सावरकर हे पराभूत नेते होते का ?

१९) मुंबईत सावरकरांचा दिनक्रम कसा असे ?


१) सावरकरांचा जन्म कधी झाला ?

वैशाख कृष्ण ६, शालीवाहन शक १८०५ – सोमवार २८ मे १८८३.

२) सावरकरांचे पूर्ण नाव काय ?

विनायक दामोदर सावरकर.

३) सावरकरांचे नाव ‘ विनायक ’ का ठेवण्यात आले ?

सावरकरांच्या आजोबांचे नाव विनायक होते. मुलाला आजोबांचे नाव ठेवण्याची प्रथा आहे, नातवाच्या रूपाने आजोबा पुन्हा जन्म घेतात अशी समजूत त्यामागे आहे, त्यामुळे सावरकरांचे नाव विनायक असे ठेवण्यात आले असावे.

४) सावरकरांची जात कोणती ?

सावरकर हे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण जातीत जन्माला आले. सर्व पेशवे घराणे, नाना फडणवीस, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, विष्णूशास्त्री चिपळूणकर, माधव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे इत्यादी अनेक महापुरूष याच जातीचे होते चित्पावन ब्राह्मण हे मध्यम उंची व चणीचे, गोरे, घारे अथवा निळसर डोळ्यांचे असतात. भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेले परशुराम हे चित्पावनांचे मूळ पुरूष मानले जातात. चित्पावनांचे मूळ स्थान म्हणजे कोकण. चित्पावनांना ब्रिटिश राजवटीबद्दल प्रचंड तिरस्कार होता. इंग्रज चित्पावनांना ‘ पूना ब्राह्मन्स ’ म्हणत असत आणि चित्पावनांवर त्यांचा विशेष रोख होता. जुलै १८७९ मध्ये मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी व्हाइसरॉय लॉर्ड लिटल यांना गुप्त पत्र लिहिले, त्यात ते म्हणतात - " आज ना उद्या ब्रिटिशांना भारतातून सत्ता सोडून जावे लागेल अशी चित्पावन ब्राह्मणांची कल्पना आहे." पुणे शहरातून सहज फेरफटका मारला तर चित्पावनांच्या चेह-यावर ब्रिटिशांसंबंधी असलेली नाराजी स्पष्टपणे दिसून येते. ‘ इंडियन अनरेस्ट ’ या पुस्तकात (पृ.३९) सर व्हॅलेंटाइन चिरोल (यानेच लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक असल्याचे म्हटले होते) याने म्हटले आहे, "चित्पावनांमध्ये गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून ब्रिटिश राजसत्तेविरूद्ध प्रचंड तिरस्काराची भावना सातत्याने अस्तित्वात असल्याचे दिसून येते. कधी ना कधी ब्रिटिश सत्तेवरून दूर होतील आणि आपण (चित्पावन) पुन्हा सत्ताधीळ होऊ अशी आशा त्यांच्या मनात निच जागी असल्याचे दिसून येते."

५) सावरकरांच्या पूर्वजांविषयी माहीती द्या.

सावरकरांचे गोत्र वशिष्ट आणि सूत्र हिरण्यकेशी अन्य चित्पावन घराण्यांप्रमाणे सावरकरांचे मूळ स्थानही कोकणात होते. गुहागर तालुक्यात पालशेत गावी सावरवाडी हे त्यांचे मूळ स्थान. या भागात सांवरी-शेंदरी कापसाची पैदास फार मोठया प्रमाणावर होती त्यामुळे त्याला सावरवाडी असे नाव पडले. सावरकर घराण्याचे मूळ नाव बापट असे होते, ते पुढे सावरकर असे झाले. काही जणांच्या मते सावरकरांचे मूळ आडनाव आके असे होते. सावरकर घराण्याचे धोपवे या शेजारील गावातील खरे कुटुंबाबरोबर घनिष्ठ संबंध होते इतर चित्पावन कुटुंबाप्रमाणे सावरकर व खरे या घराण्यांनीही नशीब काढण्यासाठी कोकणातून देशावर स्थलांतर केले. हे स्थलांतर बहुधा पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट (१६८०-१७१९) याच्या काळात झाले असावे.
देशावर आल्यानंतर सावरकर कुटुंब नाशिक जिल्ह्यात भगूर येथे स्थायिक झाले. नाशिकच्या जवळ ५-७ मैलांवर वारणा नदीच्या काठी हे गाव वसले आहे. या नदीच्या दुस-या किना-याला राहुरी हे गाव आहे. १७५६ साली बाळाजी बाजीराव पेशवे यांनी सावरकरांचे पूर्वज वेदमूर्ती महादेव दीक्षित – सावरकर व नारायण खरे यांना राहुरी हा गाव इनाम दिला. सावरकरांना या गावातून दरवर्षी १२०० रू. उत्पन्न मिळत असे. ब्रिटिशांनी या उत्पन्नावर कर बसवला आणि सावरकर कुटुंबियांचे उत्पन्न केवळ २९ रू. उरले. आपल्या आत्मचरित्रात सावरकरांनी भगूर येथे हरभट हे आपले पूर्वज प्रथम स्थायिक झाल्याची नोंद केली आहे. हरभट हे महादेव दीक्षित सावरकर यांचे वडिल. याचाच अर्थ सावरकर कुटुंब हे भगूरला बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या पूर्वीपासून स्थायिक झाले होते. भगूर येथे सावरकरांची दोन घरे एकमेकाला जोडून होती. राहुरी गाव इनाम मिळाल्यावर त्यांना बरीच मोठी शेतीवाडी व फळबागांचा लाभ झाला. त्यात एक मोठी आंबराईही होती. त्यामुळे या इनामापासून सावरकर घराण्याला चांगले उत्पन्न होत होते. एकंदरीने हे घराणे सुखवस्तू होते. दुस-या बाजीराव पेशव्याच्या पदरी बलवंत रामचंद्र सावरकर हे मुख्य कारकून होते. विजयादशमीच्या दिवशी बाजीरावाला सोन्याचे नाणे भेट म्हणून देण्याचा मान त्यांना लाभला होता. १८१७ साली बाजीराव पेशव्याने एल्फिंन्स्टनबरोबर वाटाघाटी करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले होते. त्यात परशुरामपंत सावरकर यांचा समावेश होता.

६) सावरकरांचे आई-वडिल, काका इत्यादींविषयी माहीती द्या.

सावरकरांचे सर्वात थोरले काका महादेवराव तथा बापूकाका यांचा जन्म १८३५ च्या सुमाराला झाला. ते उंच, सशक्त होते. त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नव्हते. तरी ब्रिटिशांचे कायदे आणि विविध प्रथा यांची त्यांना चांगली माहिती होती. भगूर परिसरात त्यांना चांगला मान व प्रतिष्ठा होती. ते सावकारी करत असत. त्यांचा विवाह १८५१ साली झाला. परंतु त्यांना मूलबाळ नव्हते. बापूकाकांच्या बहिणीचा विवाह कोठूरचे धोंडूनाना कानिटकर यांचेशी झाला होता.
बापूकाकांचे सर्वांत धाकटे बंधु व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वडिल दामोदर पंत यांचा जन्म १८५० च्या सुमाराला झाला. भगूरमध्ये त्यांचे प्राथमिक, मराठी शिक्षण झाले आणि त्यानंतर बापूकाकांच्या प्रयत्नांमुळे नाशिक येथे सरकारी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण झाले. दामोदरपंत हे दामूअण्णा या नावाने सर्वांना परिचित होते. संपूर्ण भगूर गावात इंग्रजी जाणणारे ते बहुधा एकटेच होते. त्यामुळे त्यांना भगूरवासियांमध्ये बराच मान होता. दामोदरपंत हे गोरे, आकर्षक व्यक्तिमत्वाचे आणि काटक-चपळ होते. त्यांनी आपल्या घरांत तलवार, बंदूक, धनुष्यबाण spear (?) अशी विविध शस्त्रे बाळगली होती. ही शस्त्रे चालवण्यात ते वाकबगारही होते आणि दरोडेखोरांचा मुकाबला करण्यात त्यांना त्याचा चांगला उपयोग होत असे. दामोदरपंतांना काकाची विशेष गोडी होती आणि ते स्वत:ही उत्तम कविता करत असत. मराठीबरोबरच संस्कृत आणि इंग्रजी काव्याचा आस्वादही ते घेत असत. त्यांच्या हजरजबाबीपणाचा इतरांवर चटकन प्रभाव पडत असे. दामोदरपंत हे स्वाभिमानी काहीसे तापट स्वभावाचे परंतु अतिशय शिस्तीचे गृहस्थ होते. कालांतराने बापूकाका व दामोदरपंत यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आणि त्याची परिणती कधीकधी शारीरिक चकमकीतही होत असे. दामोदरपंतांचा विवाह १८६७ साली, ते मॅट्रिकच्या वर्गात असताना झाला. त्यांच्या पत्नी राधाबाई या कोठूरच्या मनोहर या घराण्यातील होत्या. राधाबाईंचे वडिल हे वेदविद्यापारंगत होते. त्यामुळे त्यांना मनोहर दीक्षित असे म्हणत असत. राधाबाई लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. राधाबाईंना गोविंद नावाचे बंधु होते, ते बुद्धिमान, देखणे आणि प्रतिभाशाली कवी होते. त्याचबरोबर ते उत्कृष्ट कुस्तीगीरही होते आणि त्यांना सावरकरांना बालवयात कुस्तीचे धडे दिले होते. सावरकरांमध्ये कवित्वाचा अलौकीक गुण बहुधा त्यांचे वडिल व मामा यांचेकडून आला असावा.
सावरकरांच्या मातोश्री राधाबाई या मध्यम चणीच्या, गो-यापान तरतरीत व रूपाने सुंदर होत्या. त्यांना स्वच्छतेची मोठी आवड होती आणि त्या उत्तम सुगरणही होत्या. त्यांचा आवाज अत्यंत गोड होता. राधाबाई या धार्मिक वळणाच्या होत्या आणि घरी अनेक नोकर चाकर असूनही सर्व गृहकृत्ये त्या स्वत: करत असत. " राधाबाई म्हणजे पाच हजारात एक आहे " असे त्यांच्यविषयी भगूरमध्ये कौतुकाने बोलले जायचे. ‘ गोमंतक ’ या सावरकरांच्या महाकाव्यातील ‘ रमा ’ हे पात्र राधाबाईंवर बेतलेले आहे.
दामोदरपंत व राधाबाई यांची पहिली दोन मुले अल्पवयातच मृत्युमुखी पडली. १३ जून १८७९ रोजी त्यांना मुलगा झाला. तो म्हणजेच गणेश तथा बाबाराव सावरकर. बाबाराव हे पुढे थोर क्रांतिकारक, लेखक, तत्वज्ञ आणि हिंदुसंघटक झाले. देशभक्तीचे लखलखीत प्रतीक म्हणजे बाबाराव ! दुर्दैवाने त्यांच्या वाटयाला फार मोठी उपेक्षा आली. बाबारावांच्या पाठोपाठ आपले चरित्रनायक विनायक तथा तात्याराव यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी झाला. तात्यांचे वडिल दामोदरपंत हे त्यांना कौतुकाने ‘ बाळू ’ असे म्हणत असत. दामोदरपंत व बापूकाका यांचे सख्य नसले तरी बापूकाकांच्या विनायकावर फार जीव होता आणि ते त्याला लाडाने ‘ बाळंभट ’ म्हणत असत. विनायकाला दत्तक घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु दामोदरपंतांबरोबर पटत नसल्यामुळे ते त्यांना शक्य झाले नाही. विनायकानंतर दामोदरपंत व राधाबाई यांना मैना ही मुलगी झाली (माई). तिचा विवाह पुढे काळे घराण्यात झाला. नारायण हे दामोदरपंत व राधाबाई यांचे शेवटचे अपत्य. (जन्म १८८८). त्यांना प्रेमाने ‘ बाळ ’ असे म्हटले जात असे. ते शिक्षण व पेशाने दंतवैद्य होते आणि तरूणपणी त्यांनीही क्रांतिकार्यात भाग घेतला होता.

७) सावरकरांच्या कोणकोणत्या पुस्तकांवर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती ?

ब्रिटिशांनी सावरकरांच्या खालील पुस्तकांवर बंदी घातली होती :
१) मॅझिनीचे चरित्र (मराठी) – १९०८.
२) १८५७ चे स्वातंत्र्यसमर (Indian War of Independence) इंग्रजी – १९०९.
३) उ:शाप – नाटक – १९२७.
४) डॉ. नारायणराव सावरकर यांनी चालवलेले ‘ श्रद्धानंद ’ हे साप्ताहिक ब्रिटिशांनी १० मे १९३० रोजी बंद केले. या साप्ताहिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनेक लेख प्रकाशित होत असत.
५) जुलै १९३१ मध्ये पंजाब सरकारने सावरकरांच्या उर्दूतील चरित्रावर बंदी घातली. त्यानंतर तमीळ, कन्नड आणि मराठीतील चरित्रांवरही बंदी घालण्यात आली.
६) ‘ माझी जन्मठेप ’ या मराठी पुस्तकावर १९३४ मध्ये बंदी घालण्यात आली. २४ ऑक्टोबर, १९४० रोजी त्यांच्या तमिळ भाषेतील चरित्रावर बंदी घालण्यात आली.
७) नोव्हेंबर १९४१ मध्ये ग.पां. परचुरे यांनी लिहिलेल्या संक्षिप्त सावरकर-चरित्रावर बंदी घालण्यात आली.
८) नोव्हेंबर १९४३ मध्ये शि.ल. करंदीकर यांनी मराठीतून लिहिलेल्या सावरकर चरित्रावर बंदी घालण्यात आली.

८) रत्नागिरी येथे सावरकरांची आर्थिक स्थिती कशी होती ?

सावरकरांना १ ऑगस्ट १९२९ पासून ब्रिटिश सरकारकडून दरमहा ६० रू. निर्वाह भत्ता मिळत असे. क्वचित त्यांना जनतेकडून गौरव-निधी प्राप्त होत असे. सावरकरांनी ही रक्कम कंपनीत गुंतवली असती तर त्यांना त्यावर व्याज मिळाले असते. परंतु, त्यांनी तसे केल्याचे दिसत नाही. काही वेळा ते आपल्या काही परिचितांना व्याजाने कर्जाऊ रक्कम देत असत. परंतु, त्यांची ही बहुतेक सर्व कर्जे परत फेडण्यात आली नाहीत. त्यामुळे सावरकरांनी पुढे सर्व प्रॉमिसरी नोटा जाळून टाकल्या आणि स्वत:पुरता हा विषय संपवला ! रत्नागिरी येथे सावरकरांना तीन अपत्ये झाली. कन्या प्रभात – १९२५, (जन्म साता-याला) दुसरी कन्या शालीनी ही अल्पवयात गेली. पुत्र विश्वास – मार्च १९२८ (जन्म मुंबईत). रत्नागिरी येथील मुक्कामात सावरकरांची आर्थिक स्थिती बेतास बात होती आणि जमाखर्चाची जेमतेम तोंडमिळवणी होत असे. मात्र या स्थितीतही त्यांनी मांग जातीतील एका मुलीचे पालनपोषण - शिक्षण केले होते !


९) सावरकर – गांधी संबंध.

सावरकर उच्च शिक्षणासाठी १९०६ साली जून महिन्यात लंडनला गेले. गांधीजी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या शिष्टमंडळाचे नेते म्हणून लंडनला गेले होते. गांधीजी सावरकरांपेक्षा १४ वर्षांनी मोठे होते आणि १८८८-९१ या काळात त्यांना लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले होते. लंडन शहर त्यांना अपरिचित नव्हते आणि इंडिया हाऊसला भेट देण्याचेही त्यांना काही कारण नव्हते. पण तेथे सावरकरांनी जे विविध उपक्रम सुरू केले होते त्यामुळे इंडिया हाऊसला भेट देण्याचा आणि सावरकरांना भेटण्याचा मोह गांधीजींना टाळता आला नाही.
जुलै १९०९ मध्ये सावरकर बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण झाले परंतु त्यांच्या राजकीय हालचालींमुळे त्यांना वकीलीची सनद नाकारण्यात आली. नोव्हेंबरमध्ये गांधीजी पुन्हा लंडनला गेले होते त्यावेळी सावरकरांनी विजयादशमीनिमित्त एक प्रकट सभा भरवली होती. या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती त्यांनी गांधीजींना केली. त्यावेळी केलेल्या भाषणात गांधीजी म्हणाले - "सावरकरांचे आणि माझे काही बाबतीत मतभेद असले तरी आज येथे त्यांच्या सान्निध्यात उपस्थित राहावयाला मिळणे हा मी माझा मोठा गौरव समजतो." सावरकरांना वकीलीची सनद नाकारण्यात आल्याचा बाबीचा उल्लेख करून ते म्हणाले - "सावरकरांच्या त्यागाचा लाभ भारताला मिळाल्याशिवाय राहणार नाही."
१९२३ साली सावरकरांना पुण्यात येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याचवेळी गांधीजीही तेथे स्थानबद्ध होते. परंतु, या नेत्यांना परस्परांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही.
१९२७ साली सावरकर रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना गांधीजी महाराष्ट्राच्या दौ-यात रत्नागिरीला गेले होते. त्यावेळी सावरकर आजारी होते. त्यामुळे त्यांनी गांधीजींना आपल्या भेटीसाठी घरी बोलावले. त्याप्रमाणे गांधीजी आणि कस्तुरबा ८ मार्च रोजी त्यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. रत्नागिरी नगरपालिकेतर्फे गांधीजींचा प्रकट सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले - " रत्नागिरी हे लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान असल्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी ते तीर्थस्थान आहे. त्याचबरोबर सध्या रत्नागिरी येथे सावरकरांचे वास्तव्य असल्यामुळे मला येथे येण्याची इच्छा होती. यापूर्वी मी सावरकरांना लंडनला भेटलो होतो. त्यांची देशभक्ती आणि त्याग याबद्दल मला अत्यंत आदर आहे. ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असल्यामुळे मी त्यांना येथे येऊन भेटणे हे माझे कर्तव्य होते."

१०) गांधी हत्या प्रकरणी सावरकरांना अटक कशी झाली ?

- गांधीजींची हत्या नथूराम गोडसे याने ३० जानेवारी, १९४८ या दिवशी नवी दिल्ली येथे केली. या हत्येमध्ये येनकेनप्रकारेण सावरकरांना गोवून वाढत्या हिंदुत्ववादी चळवळीला चिरडून टाकण्याचा चंग नेहरू सरकारने बांधला होता. त्यामुळे नेहरू सरकारने खालीलप्रमाणे कुटिल कारवाया केल्या –
१) कोणत्याही कायद्याला पुर्वानुलक्ष्यी प्रभावाने लागू करणे हे अनैतिक समजले जाते. परंतु, नेहरू सरकारने मुंबई सार्वजनिक सुरक्षा कायदा दिल्ली प्रदेशाला २ जानेवारी, १९४८ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला. यासाठी २ जानेवारी, १९४८ रोजी एक अध्यादेश काढण्यात आला. केवळ गांधी हत्या खटल्यासाठीच हा बदल करण्यात आला. ब्रिटिशांनी जेव्हा जेव्हा दुस-या महायुद्धाच्या काळात विशेष न्यायालये स्थापन केली तेव्हा तेव्हा काँग्रेसी पुढा-यांनी त्याविरूद्ध आरडाओरडा केला परंतु गांधी हत्या खटल्यासाठी मात्र नेहरू सरकारने बिनदिक्कतपणे विशेष न्यायालयाची स्थापना केली. मुंबई सार्वजनिक सुरक्षा कायदा हा अत्यंत जुलमी स्वरूपाचा होता. त्यात ज्यूरीची व्यवस्था नव्हती. अपिलासाठीची मुदतही केवळ १५ दिवस होती. (अन्यथा ती ६० दिवस असते.)
या कायद्यानुसार हत्येचा केवळ प्रयत्न करणे या गुन्ह्यालाही फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतुद आहे. कायदेशीर भाषेत हत्येच्या प्रयत्नाला मदत करणे – साथ देणे आणि हत्येचा कट रचणे यामधे मोठा भेद आहे. हत्येचा कट रचणे हा अतिशय गंभीर गुन्हा समजला जातो आणि त्यासाठी कडक शिक्षा होऊ शकते. शिवाय हत्येचा कट रचणे हा आरोप सिद्ध करणेही तुलनेने सोपे असते.
२) नेहरू – पटेल आणि मंडळींना काहीही करून सावरकरांना या खटल्यात गोवायचे
होते. त्यामुळेच पटेलांनी "कटाच्या संदर्भात" या प्रकरणांचा तपास करण्याचा आदेश पोलीसांना दिला होता. सावरकर या खटल्यात गुन्हेगार म्हणून शाबित व्हावेत आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असा आग्रह नेहरूंनी धरल्याचे मुख्य सरकारी वकील श्री. दप्तरी यांनी गोपाळ गोडसे यांचे वकील श्री.एम.बी. मणियार यांना सांगितले होते. दुर्दैवाने श्री. दप्तरी अथवा श्री. मणियार यांनी यासंबंधात कोणतेही प्रतिज्ञापत्र करून ठेवले नाही.
३) मोरारजी देसाई (तत्कालीन मुंबई राज्याचे गृहमंत्री) यांनी सावरकरांवर पोलीस
गुप्तहेरांची पाळत ठेवली होती. पण गांधी हत्येनंतर मुंबईत झालेल्या जाळपोळींच्या वेळी उन्मत्त जमावापासून सावरकरांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी कोणताही पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंगरक्षक अप्पा कासार यांनाही अटक करून हलवण्यात आले. सावरकरांविरूद्ध जबानी देण्यासाठी अप्पा कासार यांचा पोलीसांनी अमानुष छळ केला. त्यांची हातापायाची नखे उचकटण्यात आली. संतप्त जमाव सावरकर-सदनावर चालून आला तेव्हा बाळाराव सावरकर, भास्कर शिंदे आणि तेंडुलकर यांनी केवळ लाठीच्या सहाय्याने जमावाला तोंड दिले. मात्र या हल्ल्यात स्वातंत्र्यवीरांचे धाकटे बंधु डॉ. नारायणराव हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच पुढे १९ ऑक्टोबर, १९४९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
४) गांधी हत्येच्या वेळी सावरकर ६४ वर्षांचे होते. तत्पूर्वी वर्षभर ते आजारपणाने
अंथरूणाला खिळून होते. त्यांना ५ फेब्रुवारी, १९४८ रोजी अटक करण्यात आली. पण, २३ मार्च पर्यंत म्हणजे ४६ दिवस त्यांना पत्नी अथवा एकुलत्या एक मुलालाही भेटू देण्यात आले नाही.
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळी केंद्रिय मंत्रीमंडळात विधी आणि न्याय
खात्याचे मंत्री होते. ते गुप्तपणे सावरकरांचे वकील ल.ब. भोपटकर यांना भेटले आणि त्यांनी सावरकरांविषयी चिंता प्रकट केली. सावरकरांविरूद्ध काडीमात्र पुरावा नाही, परंतु सर्व मंत्रीमंडळाला एका व्यक्तीच्या (नेहरू) मनमानी तंत्रापुढे झुकावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले. सावरकरांना गुंतवण्यासाठी नेहरू - सरकार काहीही करेल असा इशारा डॉ. आंबेडकरांनी दिला.
६) सरकारपक्षाचा सर्व पुरावा हा सांगोवांगी अर्धसत्यांवर आधारित होता. साक्षीदारांचा
अघोरी छळ करून व त्यांना लालूच दाखवून हा खोटा डोलारा उभारण्यात आला होता. सरकारी साक्षीदारांवर मात्र न्या. आत्मचरण यांनी नि:शंकपणे विश्वास ठेवला होता. त्याचे बक्षिस त्यांना अर्थातच मिळाले. गांधी खून खटला संपण्यापूर्वीच न्या. आत्मचरण यांना नेहरू सरकारने अजमेर – मारवाड (येरवडा) प्रदेशाचे न्यायिक आयुक्त म्हणून नेमले ! न्या. आत्मचरण यांनी सावरकरांचा अपवाद वगळता इतर सर्व आरोपींना जन्मठेप – फाशी अशा शिक्षा सुनावल्या.
७) गांधी हत्या प्रकरणाचा निकाल १० फेब्रुवारी, १९४९ रोजी लागला. सावरकरांची
निर्दोष, निष्कलंक सुटका करण्यात आली. परंतु नेहरू – पटेल सरकारने सावरकरांच्या सुटकेसाठी कोणताही सावरकरांच्या सुटकेसाठी कोणताही सार्वजनिक आनंदोत्सव करायला परवानगी दिली नाही. त्यामुळे दिल्लीच्या दंडाधिका-यांनी, सावरकरांवर, दिल्लीतील लाल किल्ला परिसर सोडून जाण्यास बंदी घातली. त्यानंतर काही तासांमध्येच सावरकरांना दिल्लीतून तडीपार करण्याचा आदेश काढण्यात आला आणि त्यांना तीन महिन्यांसाठी दिल्लीत प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली. पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात सावरकरांना दिल्लीहून मुंबईला त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. सावरकर या खटल्यात निर्दोष सुटले तरी त्यांना खटल्यासाठी आलेला खर्च भरून देण्याचा कोणताही आदेश मात्र न्यायमूर्ती आत्मचरण यांनी दिला. सावरकरांना त्या काळात या खटल्यासाठी ५० हजार रू. खर्च आला होता. (वीर सावरकर यांचे चरित्र-लेखक बाळाराव सावरकर १९४७ ते ६६ – पृ.२९९).

११) नथूराम गोडसे यांनी हत्येची सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली त्यामुळे सावरकरांची तांत्रिक मुद्यावर सुटका झाली हे खरे आहे का ?

स्वतंत्र भारतात राजकीय मतभेदापोटी हिंसक कारवाया करायला सावरकरांचा तीव्र विरोध होता. लंडन येथील मुक्कामात काही गरम डोक्याच्या तरुणांनी मवाळ नेते गोपाळ कृष्ण गोखले यांची हत्या करण्याचा विचार बोलून दाखवला तेव्हाही सावरकरांनी त्याला प्रखर आणि स्पष्टपणे विरोध केला होता. अशा हत्येमुळे क्रांतिकार्याची हानि होईल आणि त्याची उज्वल प्रतिमा कलंकित होईल असा इशारा त्यांनी दिला होता. (माझी जन्मठेप पृ.१६३). नथूराम गोडसे यांनी स्वत:चे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा सावरकर त्यात कोणत्याही प्रकारे सहभागी झाले नाहीत. या वृत्तपत्रात सावरकरांनी एखादे सदर लिहावे अशी नथूराम गोडसेंची इच्छा होती. तीही सावरकरांनी मान्य केली नाही. फाळणी टाळण्यात हिंदु महसभेचे तत्कालीन नेते यशस्वी होतील असा विश्वास नथूराम गोडसेंना उरला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र संघटना स्थापन केली होती. सावरकरांनी स्वातंत्र्यानंतर आपल्या निवासस्थानावर तिरंगा ध्वज उभारला होता. ही गोष्ट गोडसेंना अजिबात आवडली नव्हती. गांधी हत्येत सावरकरांचा कोणताही सहभाग नसल्याचे गोडसेने सांगितलेच परंतु अनन्वित अमानुष छळ होऊनही एकाही आरोपीने सावरकरांचे नाव घेतले नाही. त्यामुळेच विशेष न्यायालयाने सावरकरांची निर्दोष आणि निष्कलंक सुटका केली. नेहरू सरकारला या निर्णयाविरूद्ध वरिष्ठ न्यायालयात जाण्याची हिंमत झाली नाही.

१२) आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांविषयी सावरकरांची भूमिका काय होती ?

सावरकर हे आपल्या प्रतिस्पर्ध्यांविषयी उदारमनस्क होते. सावरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले हे राजकीय मतांबाबत परस्परविरूद्ध होते. सावरकर हे क्रांतिकारी, ब्रिटिश सत्तेविरूद्ध सशस्त्र संघर्ष पुकारणारे तर गोखले हे नेमस्त सनदशीर चळवळ करणारे होते. परंतु परस्परांबद्दल त्यांना नितांत आदर वाटत असे. सावरकर अंदमानात असताना त्यांना गोखले यांच्या मृत्युची वार्ता समजली. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या बंधूंना – नारायणरावांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे – मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य, उपयुक्ततावाद आणि व्यवहार्यता ही सावरकरांची मार्गदर्शक तत्वे होती. त्यांच्या मते सर्व राजकारणाचे अंतिम ध्येय जागतिक शासन निर्मिती हे असले पाहिजे. राष्ट्रवाद हा मानवतावादाशी सुसंगत, अविरोधी असला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. "हिंदु समाज स्वतंत्र होईल आणि तो समानता, सहृदयता आणि सज्जनांच्या रक्षणासाठी सर्व जग स्वतंत्र करेल" असे त्यांनी "ऐका भविष्याला" या आपल्या अंतिम कवितेत म्हटले आहे. सावरकरांच्या दृष्टीने मानवतावादात हिंदुत्वही अंतर्भूत आहे. त्यामुळेच अँबिसिनियातील परिस्थितीबद्दल अश्रू ढाळणा-या परंतु मुसलमानांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या हिंदुंविषयी चकार शब्दही न उच्चारणा-या काँग्रेसी नेत्यांवर त्यांनी टीकेची झोड उठवली. सावरकरांच्या मते मानवसेवा हीच ईश्वरसेवा होय.
१९०९ साली सावरकरांनी लंडनमध्ये विजयादशमीनिमित्त भारतीयांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी अध्यक्ष म्हणून गांधीजींना आमंत्रित केले होते. गांधीजींबरोबर त्यांचे मतभेद होते तरी दक्षिण आफ्रिकेत त्यांनी भारतीयांच्या हक्कांसाठी केलेली चळवळ लक्षात घेऊन सावरकरांनी त्यांना बोलावले होते.

१३) सावरकरांनी आत्मचरित्र लिहिले आहे का ?

वीर सावरकर १९२४ ते ३७ या काळात रत्नागिरीला स्थानबद्ध होते. १९३१ साली त्यांनी आत्मचरित्र लिहावयाला प्रारंभ केला. त्यातील काही भाग मुंबईच्या श्रद्धानंद मासिकात प्रकाशित झाला होता. ब्रिटिशांनी त्याला आक्षेप घेतला. सावरकरांच्या घराची झडती घेण्यात आली पण त्यांना आत्मचरित्राचा उर्वरीत अंश हाती लागला नाही. सावरकरांचे हे आत्मचरित्र ब्रिटिशांच्या दृष्टीने एवढे प्रक्षोभक होते कि रत्नागिरीच्या जिल्हाधिका-याने सांगितले –
"तुमचे हे लिखाण अत्यंत आक्षेपार्ह आहे – तुम्ही राजकारणात भाग घेता कामा नये. या अटीचा भंग करणारे हे लेखन आहे." दुर्दैवाने त्या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद अजूनही प्रकाशित झालेला नाही. पुढे १९४९ साली सावरकरांनी पुन्हा आत्मचरित्र लिहावयास प्रारंभ केला. परंतु त्यात त्यांचे केवळ बालपण व शिक्षण एवढाच वृत्तांत आला आहे. त्यानंतर हे आत्नचरित्र पूर्ण करावयास त्यांना सवड मिळाली नाही.

१४) सावरकर हे अहंकारी होते का ?

सावरकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे की माझा कान धरण्याचा अधिकार केवळ भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आहे. वरवर पाहता हे विधान अहंकारयुक्त वाटले. परंतु सावरकरांना स्वत:ची गुणसंपदा आणि नेतृत्वगुण यांचे पुरेपूर भान होते आणि खोटी विनयशीलता त्यांनी कधीच दाखवली नाही. वस्तुत: अशी दांभिक विनयशीलता म्हणजे अहंकाराचेच दुसरे रूप असते. सावरकर हे रोखठोक प्रवृत्तीचे नेते होते आणि खोटारडेपणाची त्यांना चीड होती. स्वत: थोर साहित्यिक असूनही अंदमानात त्यांनी बंदिजनांना साक्षरतेचे आणि अर्थशास्त्राचे प्राथमिक धडे दिले होते. अनेक पूर्वास्पृश्य मुलांना त्यांनी स्वत: लिहायला – वाचायला शिकविले. सावरकर हे धुरंधर क्रांतिकारक व बॅरिस्टर होते. तरी रत्नागिरी येथे स्वदेशी मालाने भरलेली हातगाडी ओढून नेण्यात त्यांनी कमीपणा मानला नाही. ते स्वत: जागतिक कीर्तिचे महाकवी होते. परंतु, हिंदु संघटनासाठी साधी कवने रचण्यात ते मागे हटले नाहीत. देवनागरी लिपीत त्यांनी असंख्य मौल्यवान सुधारणा सुचवल्या. महान लिपीतज्ञ डॉ.एल.एस.वाकणकर यांनाही सावरकरांपासूनच प्रेरणा मिळाली होती. पुढे वाकणकरांनी वयोवृद्ध सावरकरांची भेट घेतली. तेव्हा सावरकर विनम्रतेने म्हणाले होते की, ज्यांनी (सावरकरांनी) लिपी सुधारणेसंबंधात केलेल्या सूचनांना बराच कालावधी उलटला असून सद्य:स्थितीत त्यातील सूचना उपयुक्त असतील तेवढयाच स्वीकारण्यात याव्यात. या सर्वांवरून सावरकर हे अहंकारी नव्हते, हे स्पष्ट होते.

१५) सावरकर हे संकुचित वृत्तीचे होते का ?

सावरकरांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध सशस्त्र लढा दिला परंतु ते ब्रिटिश लोकांचा द्वेष करीत नसत. इंग्रजांची शिस्त, इतिहास जपून ठेवण्याची वृत्ती इत्यादी अनेक गुणांचे ते चाहते होते. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त करताना त्यांनी राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे वैरी नव्हे हे स्पष्टपणे नोंदवले आहे. पाकिस्तान निर्मितीला त्यांनी प्राणपणाने विरोध केला, इस्लामच्या विचारसरणीवरही कठोर टीका केली पण प्रेषित मोहंमदांचे नातू हुसेन यांचा करबलातील युद्धात झालेला मृत्यू वर्णन करताना त्यांची लेखणी अत्यंत हळवी व मृदू झालेली दिसते. मुसलमानांचा अनुनय, विज्ञानयुग व यंत्राला विरोध, आत्यंतिक अहिंसा इत्यादीसंदर्भात त्यांनी गांधीजींवर टीकेचे प्रहार केले. पण देशासाठी गांधीजींनी केलेल्या कार्याचे श्रेयही त्यांना मुक्तकंठाने दिले. हिंदु महासभेचे नेते असतानाही ते आपल्या कार्यकर्त्यांना सर्व राजकीय पक्षांचे धोरण समजावून घेण्याचा आणि त्यानंतरच आपले मत बनवण्याचा आग्रह करत असत.

१६) सावरकर कोणती मार्गदर्शक तत्वे मानत असत ?

मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य, उपयुक्ततावाद आणि व्यवहार्यता ही सावरकरांची मार्गदर्शक तत्वे होती. त्यांच्या मते सर्व राजकारणाचे अंतिम ध्येय जागतिक शासन निर्मिती हे असले पाहिजे. राष्ट्रवाद हा मानवतावादाशी सुसंगत, अविरोधी असला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. "हिंदु समाज स्वतंत्र होईल आणि तो समानता, सहृदयता आणि सज्जनांच्या रक्षणासाठी सर्व जग स्वतंत्र करेल" असे त्यांनी "ऐका भविष्याला" या आपल्या अंतिम कवितेत म्हटले आहे. सावरकरांच्या दृष्टीने मानवतावादात हिंदुत्वही अंतर्भूत आहे. त्यामुळेच अँबिसिनियातील परिस्थितीबद्दल अश्रू ढाळणा-या परंतु मुसलमानांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या हिंदुंविषयी चकार शब्दही न उच्चारणा-या काँग्रेसी नेत्यांवर त्यांनी टीकेची झोड उठवली. सावरकरांच्या मते मानवसेवा हीच ईश्वरसेवा होय.

१७) सावरकर हे निराश मन:स्थितीत मरण पावले हे खरे आहे काय ?

सावरकरांचा शेवटचा लेख "आत्महत्या की आत्मार्पण" हा १९६३ साली प्रसिद्ध झाला. या लेखाचा प्रारंभ आणि शेवट अवधूत उपनिषधातील श्लोकांनी झाला आहे. हा श्लोक असा आहे - "धत्योहं धत्योहं कर्तव्यं मे न विधते किंचित – धन्योहं धन्योहं प्राप्तव्यं सर्वमाद्य संपन्नम". मी धन्य धन्य झालो आहे. माझे कोणतेही कर्तव्य करावयाचे उरलेले नाही आणि जे जे मिळवायचे ते सर्व मला प्राप्त झाले आहे. या लेखात सावरकरांनी प्राणत्यागाची प्रत्येक कृती ही आत्महत्या मानली जाऊ नये असे प्रतिपादिले आहे. क्रोध, विपन्नता, असमाधान, पळपुटेपणा यापोटी होणारा आत्मनाश यालाच आत्महत्या समजण्यात यावे, याउलट जीवनात जे प्राप्तव्य ते मिळवल्यानंतर समाधानाने केलेला प्राणत्याग म्हणजे आत्महत्या नव्हे असे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी कुमारील भट्ट, रामानुज, संत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास इत्यादींचे दाखले दिले आहेत.
१९५२ साली सावरकरांनी आपण कृतकृत्य असल्याचे आणि देश स्वतंत्र होण्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे अतिशय तृप्त असल्याचे म्हटले आहे.
सावरकरांनी जे सांगितले तसे स्वत: आचरण करून दाखवले. ३ फेब्रुवारी १९६६ पासून त्यांनी अन्न घेणे बंद केले. काही दिवसांनंतर त्यांनी द्रव आहारही बंद केला. त्यानंतर त्यांनी औषधे घेणे थांबवले. २४ फेब्रुवारी १९६६ रोजी दोन्ही हात जोडून क्षीण आवाजात ते म्हणाले - "आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा" (संत तुकाराम) हेच त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शेवटचे शब्द होते. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

१८) सावरकर हे पराभूत नेते होते का ?

सावरकर हे महान स्वातंत्र्य सेनानी व थोर नेते होते परंतु नेहरू सरकारला त्यांचे वावडे होते. स्वतंत्र भारतात त्यांच्या वाट्याला कोणताही सरकारी मानसन्मान (पक्ष पुरस्कारासारखा) तर राहोच साधे विशेष न्याय दंडाधिका-याचे पदही आले नाही, याचा अर्थ ते यशस्वी झाले की पराभूत झाले ?
१९४० साली सावरकरांनी आसाममध्ये होणा-या मुस्लिम घुसखोरीबद्दल सावधानतेचा इशारा दिला होता. जवाहरलाल नेहरूंनी "निसर्गात पोकळी राहू शकत नाही" असे म्हणून त्याची खिल्ली उडवली पण सावरकरांनी "ही पोकळी विषारी वायुने भरली जात आहे" असे प्रत्युत्तर दिले. आता २००८ साली आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या चार ते पाच कोटींवर गेली आहे !
१९४१ साली जात-धर्मावर आधारीत जनगणना होणार होती. त्या कारणावरून काँग्रेसने त्यावर बहिष्कार घातला. सावरकरांनी याविरूद्धही सावधगिरीचा इशारा दिला. पुढे फाळणीच्या वेळी याच जनगणनेच्या आधारे भारत पाकिस्तानच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. त्यावेळी मात्र काँग्रेसने ही आकडेवारी निमूटपणे मान्य केली.
सावरकरांनी मुसलमानांच्या फुटीरतेचे अचूक विश्लेषण केले आणि गांधीजींचे मुस्लिम अनुनयाचे धोरण आत्मघातकी ठरेल, असा इशारा दिला. पुढे ६ ऑक्टोबर, १९४६ रोजी ‘हरिजन’ या नियतकालीकातील लेखात गांधीजींनी हिंदु-मुस्लिम ऐक्याबाबत आपल्याला संपूर्ण अपयश आल्याची कबुली दिली.
१९४० पासून सावरकर पाकिस्तानच्या ध्येयाबाबत सर्व देशवासियांना जागृत करत होते. याउलट अगदी १९४५ मध्येही "पाकिस्तान अस्तित्वात येणार नाही" असे जवाहरलाल नेहरू म्हणत होते.
देशाच्या सैन्यात देशभक्त हिंदुस्थानी तरूण मोठया प्रमाणावर शिरल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असे सावरकर उच्च रवाने सांगत होते. त्याचाही प्रत्यय १९४७ साली सैन्यात व नौदलात बंड झाल्यावरच ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुढच्याच महिन्यात सप्टेंबर १९४७ मध्ये सावरकरांनी काश्मीरवर पाकिस्तान हल्ला करेल त्याचप्रमाणे हैद्राबादचा निजाम बंड करेल असा इशारा दिला होता, तोही खरा ठरला. समर्थ, अद्ययावत, लष्कर उभारण्याची आवश्यकता त्यांनी सातत्याने प्रतिपादन केली. याउलट जवाहरलाला नेहरूंनी पहिल्या भारतीय लष्कर प्रमुखांना, "देशाला यापुढे लष्कराची गरज नाही, केवळ पोलीस दल पुरेसे आहे" असे सांगितले आहे ! सर्व देश नेहरूंच्या पंचशील धोरणामुळे बेसावध झालेला असताना आणि सर्वत्र हिंदी – चीनी भाई भाई हा गजर चालू असताना सावरकरांनी चीनच्या तिबेटवरील आक्रमणाबाबत देशाला सावध करण्याचा खटोटोप चालवला होता.
सावरकरांचे प्रत्येक भाकीत नियतीने खरे ठरविले आहे.
सावरकर अपयशीस पराभूत ठरले नाहीत, पराभूत ठरला तो त्यांची उपेक्षा करणार हिंदू समाज आणि त्याचे तत्कालीन नेते !

१९) मुंबईत सावरकरांचा दिनक्रम कसा असे ?

सावरकरांची दिनचर्या शिस्तबद्ध, ठराविक असे. ते रोज सकाळी ७, ७।। ला उठत, नंतर चहा घेत. वर्तमानपत्रांचे वाचन चाले. (वाचताना ते महत्वाच्या मजकुरावर पेन्सिलने खुणा करत.) त्यानंतर ते न्याहारी घेत असत. त्यात बहुधा एखादे उकडलेले अंडे व लोणी असे. ठराविक वेळेला त्यांचा नापित दाढी करण्यासाठी येत असे. त्यानंतर तात्याराव लोकांच्या भेटीगाठी घेत असत. (या बहुधा सर्व पूर्वनियोजित असत.) प्रसाधनगृहाची स्वच्छता तात्या आवर्जून स्वत: करत असत. काही काळ त्यांना तपकीर ओढण्याची सवय होती. पण, पुढे त्यांनी ती सोडून दिली. १२ ते १२।। च्या सुमारास ते स्नान करत. एकच्या सुमारास दुपारचे भोजन होई, त्यात भात, पोळी, भाजी, वरण असे नेहमीचे साधे जिन्नस असत. आपल्यासाठी कुटुंबातील अन्य कोणीही जेवणासाठी खोळंबून राहू नये असे त्यांनी सांगून ठेवले होते. एकटयानेच शांतपणे जेवायला त्यांना आवडे. अन्नही गरम न घेता गार घेत असत. (अंदमानातील वास्तव्याचा परिणाम असावा.) जेवताना त्यांच्याशी कोणीही बोललेले त्यांना आवडत नसे. तात्यारावांना मांसाहार विशेषत: मत्स्याहार आवडत असे. परंतु घरात तो शिजवला जात नसे. काही वेळा त्यांचे काही स्नेही त्यांचेसाठी मांसाहार मासे पाठवत असत. (उदा. लता मंगेशकर यांच्या मातोश्री माई मंगेशकर) तात्यारावांना थालीपीठ, शिळी भजी, नाशिकचा चिवडा, अनारसे इत्यादी पदार्थ विशेष प्रिय होते. सणासुदीला ते दुकानातून मिठाई मागवत असत. आषाढी / कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र यांसारख्या दिवशी त्यांच्या पत्नी भगर, दाण्याची आमटी वगैरे उपवासाचे पदार्थ करीत असत, तेही त्यांना चालत असत. परंतु, कोणतेही धार्मिक व्रत म्हणून ते उपवास करीत नसत. जेवणानंतर तात्याराव थोडा वेळ वामकुक्षी घेत. दुपारच्या चहानंतर लेखन – वाचन चाले. त्यानंतर पुन्हा दिवाणखान्यात स्नेही – नातेवाईक यांच्या भेटीसाठी येत असत. यावेळी विशेषत: लहान मुलांबरोबर ते थट्टामस्करी करत असत. संध्याकाळी काही काळ ते ध्यानधारणा करावयाचे. शिवाय संध्याकाळी बाहेर फिरावयासही जात असत. प्रारंभीच्या काळात दादर चौपाटी हे त्यांचे आवडते ठिकाण होते. पण तेथे लोकांची गर्दी होऊ लागल्यामुळे नंतर नंतर ते घराच्या गच्चीवरच फे-या मारावयाचे. रात्री ८.३०, ९ ला रात्रीचे भोजन होई. त्यात भात, भाजी, तूप यांचा सामावेश असे. त्यानंतर पुन्हा लेखन – वाचन. त्यांचे बहुतेक सर्व लेखन रात्री झालेले आहे. लिहिण्यासाठी बॉलपेनऐवजी त्यांना साधे फौंटन पेन आवडत असे. त्यांचा काटकसरी स्वभाव त्यांच्या महान अक्षरांमधुनही प्रतिबिंबित होतो. लहान अक्षरामुळे कमी जागेत जादा मजकूर मावत असे. रात्री झोपताना ते पंखा बंद करून त्याचप्रमाणे सर्व खिडक्या लावून घेत असत. क्वचित पंखा चालू ठेवला तरी त्याचे तोंड विरूद्ध दिशेला फिरवलेले असे. रत्नागिरी येथे माई हळदीकुंकवाचे कार्यक्रम सर्व जातींमधील महिलांसाठी करत असत. मुंबईत ते बंद झाले. घरात एक तांब्याचा देव्हारा होता. त्यात बाळकृष्ण आणि चार अन्नपूर्णा यांच्या मूर्ती होत्या. शिवाय लक्ष्मीची एक तसबीर होती. सौ. माई भक्तीभावाने पूजा करत, तात्या ती पाहत असत. मात्र ते स्वत: कधीही पूजा करत नसत.
एकूण तात्यारावांची राहणी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाप्रमाणे होती. ते बंद गळ्याचा, लांब बाह्यांचा सदरा, धोतर असा पोषाख करत . जुन्या धोतराचे चौकोनी तुकडे रूमाल म्हणून कामी येत असत. नाटक किंवा चित्रपट पहावयास ते बहुधा कधी जात नसत. इतकेच साधा रेडीओही त्यांच्याकडे फार उशीरा, त्यांचे "जयोस्तुते" हे स्वतंत्रतेचे स्तोत्र गीतरूपाने आकाशवाणीवरून प्रसारीत होऊ लागल्यावर आला ! तात्यारावांना अत्तराची आवड होती. ते हीना हे अत्तर वापरत असत. सौ. माई तात्यारावांच्या खोलीत चाफा, प्राजक्त इत्यादी सुगंधी फुले ठेवीत असत. धूम्रपान किंवा मद्यपान त्यांना वर्ज्य होते. त्यांनी आपल्या कोणत्याही आवडीनिवडी माईंवर लादल्या नाहीत किंवा विशिष्ट खाद्यपदार्थांसाठीही आग्रह धरला नाही.