प्रश्नोत्तरे
   

इंग्लंडमध्ये सावरकर प्रवास कसा करत असत ?

इंग्लंडमध्ये सावरकरांची आर्थिक स्थिती कशी होती ?

सावरकरांना वकीलीची सनद का देण्यात आली नाही ?

सावरकरांच्या प्रेरणेने मादाम कामा यांना स्टटगार्ट (जर्मनी) येथे राष्ट्रध्वज फडकावला, या घटनेचे महत्व सांगा.

१९१० साली सावरकर पॅरिसहून लंडनला परत आले त्यावेळी आपल्याला अटक होणार याची त्यांना पुरेपूर कल्पना होती, तरीही आपली ब्रिटिश मैत्रिण मार्गारेट लॉरेन्स हिला भेटण्यासाठी ते आले हे खरे आहे का ?

बाबाराव सावरकर यांना झालेल्या तुरूंगवासाच्या शिक्षेचे स्वरूप काय होते ?

सावरकरांच्या तुरूंगवासाचे स्वरूप काय होते ?

अंदमानपूर्वी सावरकर हे उग्र क्रांतिकारक होते पण नंतरच्या काळात त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध एकही लढा पुकारला नाही. तुरूंगवासातून सुटण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारला केलेल्या आवेदनात सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचे वचन दिले एवढेच नव्हे तर आपल्या सहका-यांनाही सशस्त्र लढयापासून सनदशीर मार्गाकडे वळवण्याचे वचन दिले. तुरुंगातील छळामुळे त्यांचे मनोधैर्य नष्ट झाले होते का ?

सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही तर "मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे" अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले व ह्याचे पुरावे नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' उपलब्ध आहेत. (पहा: Far from heroism - The tale of 'Veer Savarkar by Krishnan Dubey and Venkitesh Ramakrishnan, 7 Apr 1996, Frontline)

अंदमानात सावरकरांची प्रकृती ढासळल्याने सरकारने त्यांना भारतात परत पाठवले हे खरे आहे का ?

सशस्त्र लढयावर सावरकरांचा कोणता प्रभाव पडला ?

भारतीय स्वातंत्र्यलढयात सावरकरांचे योगदान काय ?


इंग्लंडमध्ये सावरकर प्रवास कसा करत असत ?

लंडनमध्ये भुयारी रेल्वेचे जाळे आहे. पण २२ जून १९०७ पर्यंत टोटनहॅम कोर्ट रोड – यूस्टन – आर्कवे मार्गावर भुयारी रेल्वे नव्हती. त्यामुळे लंडनमधील वास्तव्यात निदान पहिल्या वर्षी तरी सावरकरांनी बस किंवा ट्राममार्गे ६५, क्रॉमवेल अँव्हेन्यू, हामगेट ( इंडिया हाऊसचा फक्त) आणि ग्रेज इऩ (सावरकरांचे बॅरिस्टरीचे महाविद्यालय) या दरम्यान प्रवास केला असणार.

इंग्लंडमध्ये सावरकरांची आर्थिक स्थिती कशी होती ?

सावरकरांना उच्च शिक्षणासाठी पं. शामजी कृष्णवर्मा यांनी शिष्यवृत्ती दिली होती. तिची रक्कम दर सहामाहीसाठी ४०० रू. अशी होती. प्रत्येकी ४०० रू. चे पाच हप्ते याप्रमाणे एकंदर २ हजार रू.ची ही शिष्यवृत्ती होती. त्यावेळी विनिमयाचा दर, १५ रू. = १ पौंड असा होता. याचाच अर्थ सावरकरांना सुमारे १३३ पौंड मिळणार होते. (दरवर्षी सुमारे ४४ पौंड). इंडिया हाऊसमध्ये राहण्याचा खर्च आठवडयाला १ पौंड होता असे सावरकरांनी १९ मार्च १९०९ च्या आपल्या वार्तापत्रात नमूद केले आहे. (सावरकरांनी ‘दर आठवडयाला’ असे वेगळे नमूद केलेले नाही. परंतु त्याकाळी सर्व जमाखर्च साप्ताहिक कोष्टकानुसार होत असे त्यावरून हे अनुमान आम्ही केले आहे.) याप्रमाणे एका वर्षाचा खर्च ५२ पौंड होतो परंतु सावरकारांना सुमारे ४४ पौंडच शिष्वृत्ती मिळत असे. उरलेला खर्च त्यांना त्यांचे श्वशुर श्री. चिपळूणकर यांचेकडून मिळत असे. या नित्य खर्चाव्यतिरिक्त सावरकरांना खालीलप्रमाणे अन्य खर्च आला होता.
१) मुंबई – लंडन जहाज प्रवास – १७ पौंड (सुमारे)
२) कपडे
३) शिक्षणाचे शुल्क
४) परीक्षा शुल्क
५) पुस्तके
६) इंग्लंडमधील प्रवास
आपल्या श्वशुरांच्या सहाय्यामुळेच सावरकर हा खर्च करू शकले. याप्रमाणे इंग्लंडमधील त्यांची आर्थिक स्थिती जितक्यास तितकीच होती.

सावरकरांना वकीलीची सनद का देण्यात आली नाही ?

सावरकरांनी ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावयाचे नाकारले त्यामुळे त्यांना वकीलीची सनद देण्यात आली नाही, असा अनेक व्यक्तींचा समज आहे. यासंबंधीचा घटनाक्रम असा :
सावरकरांनी बॅरिस्टरीच्या शिक्षणासाठी ग्रेज इन सोसायटीमध्ये २६ जून, १५०६ रोजी नोंदणी केली. त्यानंतर ते रीतसर परीक्षा उत्तीर्ण झाले. ५ मे, १९०९ रोजी त्यांना वकीलीची सनद मिळावयास हवी होती. परंतु त्यांच्या राजकीय हालचालींमुळे ती मिळाली नाही. सावरकर लंडनला आल्यापासूनच भारतमंत्र्यांचे सल्लागार सर कर्झन वायली यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. १३ मे, १९०९ रोजी कर्झन वायलीच्या प्रयत्नांमुळे, ग्रेज इनच्या संचालकांनी सावरकांवर विविध आरोप ठेवले. सावरकरांना उत्तर देण्यासाठी २२ मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यावर विचार करून ९ जूनला निर्णय घेण्यात येणार होता. यथाकाल शिस्तभंग समितिपुढे सावरकरांची साक्ष झाली. काही नामांकित बॅरिस्टरांनी त्यांची उलट-तपासणी घेतली. भारत (ब्रिटिश) सरकार व इंडिया ऑफिसतर्फे सावरकरांच्या विरोधात पुरावे सादर करण्यात आले. भारत (ब्रिटिश) सरकारच्या ताब्यातील पत्रे आणि नाशिक करारसंबंधातील सावरकरांच्या पत्रांचे अनुवादही सादर करण्यात आले. सावरकरांवर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी चालू असतानाच नवनवीन आरोप करण्यात येत होते. सुनावणी गुप्तपणे (इन कॅमेरा) चालू होती आणी प्रकट सुनावणीमध्ये जो पुरावा ग्राह्य धरता आला नसता तोही येथे स्वीकारण्यात आला. सावरकरांवर दोन वर्षे पाळत ठेवलेल्या गुप्तहेरांनी आपला पुरावा मांडला. स्वत: सावरकरांची तीन तास उलट तपासणी घेण्यात आली. एवढे सर्व होऊनही सावरकरांवर एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही ! १४ जुलै, १९०९ रोजी संचालकांनी सावरकरांवर एकही आरोप सिद्ध होऊ शकत नसल्याचा निर्णय दिला मात्र सावरकरांविषयी अद्यापही संशय कायम असल्याने त्यांना वकीलीचा सनद देण्यात येऊ नये असेही स्पष्ट केले. पुढे १९१० साली सावरकरांनी ग्रेज इनमधुन आपले नाव काढून घेतले. (समग्र सावरकर वाड़मय खंड ४ पृ.१३२/३/४) ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचा प्रसंगच उद्भवला नाही पण तशी वेळ आली असतीच तर सावरकरांनी बिनदिक्कतपणे तशी शपथ घेतली असती आणि वेळ येताच ती मोडली असती. दीर्घ काळ हिंदू – मुस्लीम आणि ब्रिटिशांनी दिलेल्या वचनांना जागले आणि त्यापायी त्यांनी अपरिमित हानी सोसली. आता हिंदूंनीही व्यवहारी होण्याची गरज आहे असेच सावरकरांचे मत होते.

सावरकरांच्या प्रेरणेने मादाम कामा यांना स्टटगार्ट (जर्मनी) येथे राष्ट्रध्वज फडकावला, या घटनेचे महत्व सांगा.

जर्मनीत स्टटगार्ट येथे १८/१९/२० ऑगस्ट १९०७ ला आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद झाली. त्यासाठी सावरकरांना आमंत्रित करण्यात आले होते. भारताचे प्रतिनिधित्व मादाम रूस्तम भिकाजी कामा यांचेकडे होते. या परिषदेत भारताच ध्वज कोणता असावा, याविषयी चर्चा झाली. अमेरिकेच्या राष्ट्रध्वजावर तेथील संस्थाने दर्शवणारे ता-यांचे चित्र आहे, त्या धर्तीवर भारतीय ध्वजावर भारतातली ८ मोठया राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे ८ कमळांचे चित्र घालण्यात आले. हा ध्वज तिरंगी होता. हिरवा पट्टा तारूण्याचा निदर्शक, भगवा पट्टा विजयाचा निदर्शक आणि लाल पट्टा रक्ताचा, त्यागाचा, सामर्थ्याचा निदर्शक. हिरवा पट्टा हा मुसलमानांचा अनुनय करण्यासाठी नव्हता हे लक्षात ठेवले पाहिजे.
भारताची चिरकालीनता दर्शविण्यासाठी ध्वजावर सूर्य व चंद्र यांचे चित्र होते. (यावच्चंद्र दिदा करौ). चंद्राचे चित्र मुसलमानांना खूश करण्यासाठी नव्हते. हे पुन्हा ध्यानात घेतले पाहिजे.
ध्वजावर ‘वंदे मातरम्’ हा मंत्रही अक्षरांकित केलेला होता. असा हा ध्वज मादाम कामा यांनी स्टटगार्ट परिषदेत फडकावला. हाच ध्वज सावरकरांनी २६ ऑक्टोबर, १९३७ रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात फडकावला. (स.सा.वा.,खंड ४ पृष्ठ ३७१/२/३).

१९१० साली सावरकर पॅरिसहून लंडनला परत आले त्यावेळी आपल्याला अटक होणार याची त्यांना पुरेपूर कल्पना होती, तरीही आपली ब्रिटिश मैत्रिण मार्गारेट लॉरेन्स हिला भेटण्यासाठी ते आले हे खरे आहे का ?

सावरकर १९०६ ते १० या काळात लंडनला होते, त्यावेळी काही ब्रिटिश स्त्री-पुरूष
त्यांचे चाहते झाले होते. मार्गारेट लॉरेन्स त्यापैकी एक असू शकते. जानेवारी १९१० मध्ये हवापालटासाठी सावरकर पॅरीसला गेले. १३ मार्च, १९१० रोजी ते लंडनला परत आले. त्यादिवशीच त्यांना पकडण्यात आले व भारतात पाठवण्यात आले. पुढे त्यांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. सावरकर हे मार्गारेट लॉरेन्सला भेटण्याच्या मोहापायी, तिच्या पत्रानुसार लंडनला आले. अन्यथा ते पुढील धोका लक्षात घेता कशाला आले असते अशी अफवा ब्रिटिशांनी उठवली होती. (मनोहर माळगावकरांसारखा मातब्बर लेखकही या अफवेला बळी पडल्याचे दिसते. पहा त्यांचे पुस्तक – Men who killed Gandhi, १९७९, पृ.२५ ते २८). यासंबंधातील वस्तुस्थिती अशी आहे.
सावरकर ब्रिटिशांविरोधी सशस्त्र संघर्ष उभा करू पाहत होते. पण काही महत्वाच्या सहका-यांची अकार्यक्षमता, अधीरता इत्यादींमुळे तो हवा तसा प्रकट होत नव्हता. दरम्यान ब्रिटिश सरकारच्या अत्याचारांमुळे सावरकरांच्या अनेक सहका-यांची कुटुंबे संकटात सापडली होती. खुद्द सावरकरांचे थोरले बंधु बाबाराव यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि तुरूंगात त्यांचा अतोनात छळ करण्याच येत होता. (वीजेचे शॉक देणे इ.इ.). धाकटे बंधु नारायणराव यांच्यावरही खटला भरण्यात आला होता. बाबारावांच्या पत्नी येसूवहिनी यांना कोणीही आश्रय देण्यास धजत नव्हता. त्यामुळे त्यांना धर्मशाळेत राहावे लागत होते. लंडनमधील सावरकरांच्या सहका-यांचे जिणेही ब्रिटिश सत्तेने असह्य केले होते. त्यामुळे स्वातंत्र्यलढयात आपणही त्याग करण्यास, यातना सोसण्यास सिद्द आहोत हे दाखवण्याची तळमळ सावरकरांना लागली होती. यात कर्तव्याच्या भावनेपोटी ते पॅरीसहून लंडनला सर्व धोके पत्करून गेले. सावरकरांचे सहकारी ग्यानचंद वर्मा यांनी सावरकर – चरित्रकार शि.ल. करंदीकर यांचेपाशी म्हटल्याप्रमाणे - "भारतमाता हेच सावरकरांचे एकमेव प्रियपात्र होते." (शि.ल.करंदीकरकृत सावरकर चरित्र – पृ. ३३९. क्रांतिकल्लोळ, लेखक वि.श्री.जोशी, मनोरमा प्रकाशन १९८५, पृ.३४७.).

बाबाराव सावरकर यांना झालेल्या तुरूंगवासाच्या शिक्षेचे स्वरूप काय होते ?

बाबारावांना १९०९ साली अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आले. (त्यांनी ४ प्रक्षोभक कविता प्रकाशित केल्याचा आरोप होता.) त्यांची सर्व स्थावर – जंगम मालमत्ता (अगदी केरसुणीपर्यंत !) जप्त करण्यात आली. त्यांच्या पत्नी येसूवहिनी या बेघर, निर्धन, निराश्रित झाल्या आणि काही काळ त्यांना धर्मशाळेत आसरा घ्यावा लागला. १९१८ साली निपुत्रिक अवस्थेत त्यांना मरण आले. परंतु, शेवटपर्यंत आपल्या पतीची भेट त्यांना घेता आली नाही. वास्तविक नियमानुसार अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा संपूर्ण काळ तुरूंगवासाची नसे, पहिल्या एक-दोन वर्षानंतर बंदिजनांना अंदमानातच स्वतंत्रपणे राहता येत असे. एवढेच नव्हे तर भारतातून आपल्या नातेवाईकांनाही बोलावून घेता येत असे. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर व बाबाराव यांना मात्र ही सवलत देण्यात आली नाही आणि १० वर्षांहून अधिक काळ अंदमानातील तुरूंगात खितपत पडावे लागले. त्यांना आत्यंतिक श्रमाची कामेही करावी लागली. (उदा. कोलू फिरवणे.) अंदमानात व तत्पूर्वी ठाणे कारागृहांतही बाबारावांचा अमानुष छळ करण्यात आला. त्यांना वीजेचे शॉक देण्यात आले पण त्यांनी सर्व छळ धैर्याने सोसला. पण क्रांतिकार्याशी द्रोह केला नाही. १९२१ साली बाबारावांना अंदमानातून भारतात आणण्यात आले आणि विजापूर येथील तुरूंगात ठेवण्यात आले. तेथे तब्बल आठ महिने त्यांना कठोर एकांतवासात ठेवण्यात आले. हा एकांतवास किती भीषण होता हे लक्षात घेतले पाहिजे. बाबारावांच्या कोठडीत एक चिमणी घरटे बांधत होती. या चिमणीच्या व तिच्या पिल्लांच्या हालचाली पाहून बाबाराव आपले मन रमवीत असत. पण त्यांना तेवढाही विरंगुळा मिळू नये या दुष्ट हेतूने ब्रिटिशांनी चिमणीचे ते घरटे तेथून काढून टाकले होते ! बाबारावांना अगदी प्राथमिक स्वरूपाचे वैद्यकीय उपचारही मिळत नसत. त्यांना तीव्र डोकेदुखीचा विकार जडला होता आणि त्यातून सुटका मिळवण्यासाठी ते छोटयाशा दगडाने कपाळावर आघात करत असत. शेवटी ते मरणार अशी खात्री झाल्यावरच ब्रिटिशांनी त्यांची तुरूंगातून सुटका केली.

सावरकरांच्या तुरूंगवासाचे स्वरूप काय होते ?

१९१० मध्ये सावरकरांना अंदमानातील २ काळ्या पाण्यांची, एकंदर ५० वर्षांची कठोर शिक्षा झाली. संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याच्या इतिहासात एवढया भयावह शिक्षेचे दुसरे उदाहरण नाही. सावरकरांच्या गळ्यात जो कैद्यांचा धातूचा बिल्ला होता. त्यावर शिक्षेचा दिनांक २४ डिसेंबर, १९१० व सुटकेचा दिनांक २३ डिसेंबर, १९६० असे कोरलेले होते ! Dangerous, धोकादायक कैदी म्हणून D हे अक्षरही त्यावर कोरलेले होते.
बाबारावांप्रमाणे तात्यारावांचीही सर्व मालमत्ता – अगदी त्यांचा चष्माही – जप्त करण्यात आली होती. याच काळात मुंबई विद्यापीठाने त्यांची बी.ए. ही पदवीही रद्द केली.
अंदमानातील कारावासात असताना सावरकरांना वर्षातून केवळ एक पत्र आपले नारायणराव यांना लिहिण्याची परवानगी होती. अंदमानातील काळ्या पाण्यावर सर्वच्या सर्व कालावधी तुरूंगात ठेवण्यात येत नसे. २-३ वर्षांनंतर अंदमानातच स्वतंत्र राहण्याची परवानगी मिळत असे. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना, बाबारावांप्रमाणेच, ही सवलत नाकारण्यात आली.
पुढे भारतात सावरकरांच्या सुटकेसाठी जनमत व्यक्त होऊ लागले तेव्हा अंदमानात तुरूंगातून त्यांना बाहेर स्वतंत्र राहता येऊ नये यासाठी त्यांना (व बाबारावांना) भारतात पाठवण्यात आले. सावरकर बंधुंना भारतात पाठवून ब्रिटिशांनी मोठी उदारता दाखवली, असा कित्येकांचा समज आहे, पण तो चुकीचा आहे. उलट भारतात आणल्यामुळे सावरकर बंधुंना पुन्हा कठोर कारावासात ठेवणे ब्रिटिशांना शक्य झाले. पुढे वाढत्या जनक्षोभामुळे सावरकरांना तुरूंगातून सोडणे ब्रिटिशांना भाग पडले. परंतु तसे करतानाही ब्रिटिशांनी तात्यारावांना १२ वर्षे रत्नागिरीला स्थानबद्ध राहण्याची अट घातली यामागे ही रत्नागिरीसारख्या आडबाजूच्या गावात सावरकरांना डांबून त्यांचा समाजाशी व्यापक संपर्क येऊ नये, याची व्यवस्था ब्रिटिशांनी केली होती. शिवाय या स्थानबद्धतेत राजकारणात भाग न घेण्याची अटही घालण्यात आली होती. सुरूवातीला स्थानबद्धतेची मुदत ५ वर्षांसाठीच होती पण पुढे ती दोन वेळा वाढवून एकूण १३ वर्षांसाठी करण्यात आली.

अंदमानपूर्वी सावरकर हे उग्र क्रांतिकारक होते पण नंतरच्या काळात त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध एकही लढा पुकारला नाही. तुरूंगवासातून सुटण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारला केलेल्या आवेदनात सनदशीर मार्गाचा अवलंब करण्याचे वचन दिले एवढेच नव्हे तर आपल्या सहका-यांनाही सशस्त्र लढयापासून सनदशीर मार्गाकडे वळवण्याचे वचन दिले. तुरुंगातील छळामुळे त्यांचे मनोधैर्य नष्ट झाले होते का ?

प्रथम सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या तुरूंगात खितपत पडणे ही काही सावरकरांची देशभक्तीची कल्पना नव्हती, ते त्यांचे ध्येयही नव्हते. ‘माझी जन्मठेप’ मध्ये त्यांनी लिहिल्याप्रमाणे हेतुत: देशद्रोह करण्याची बाब वगळता बाकी सर्व अटी मान्य करून देशभक्तांनी तुरूंगातून बाहेर पडावे आणि एकदा बाहेर पडल्यावर परत देशकार्याला सुरूवात करावी अशीच सावरकरांची भूमिका होती. देशभक्तांनी तुरूंगातील अन्याय – अत्याचाराविरूद्ध उपोषण करून प्राण देण्याच्या कल्पनेला त्यांचा यामुळेच विरोध होता. राजपुतांचे आत्मार्पण प्रशंसनीय असले तरी अनुकरणीय नाही असेच सावरकरांचे स्पष्ट मत होते. यादृष्टीने पाहता सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. महाराजांनीही वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली, त्याच्या मानहानीकारक अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच मोगली सत्तेविरूद्ध संघर्ष चालू ठेवला.
ब्रिटिशविरोधी कारवाया केल्याबद्दलच सावरकरांना वकीलीची सनद नाकारण्यात आली होती, अशा प्रकारचे त्यांचे हे पहिलेच उदाहरण होते. सावरकरांचा कारावास किती कठोर होता यासंबंधीचा काही तपशील असा आहे. –
१) सहा महिने कठोर एकांतवास
२) सात खडी दंडाबेडी
३) काम करण्याचे नाकारल्याबद्दल १० दिवस खोडाबेडी (मुंबई सरकारचे प्रकाशन खंड २, पृ. ४७८/९)
या भयानक शिक्षा ब्रिटिशांबरोबर सावरकरांनी हातमिळवणी केल्याचे दाखवतात काय ? तुरूंगवासात त्यांचे मनोधैर्य तर खचले नाहीच पण त्यांनी तशा अमानुष बंदिवासातही हाती साधी कागदपेन्सिल नसतानाही तुरूंगातील भिंतींवर ५ हजार ओळींचे उत्कट काव्य लिहिले आणि ते सर्व मुखोद्गत केले ! संपूर्ण जगाच्या इतिहासात अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण आहे. मनोधैर्य खचल्याचे हे लक्षण म्हणता येइल का ?
ब्रिटिश अधिकारी सावरकरांबाबत विशेष सावधगिरीने आणि अतीव दुष्टाव्याने वागत होते. सावरकर बंधुंना सोडावे लागू नये यासाठी ब्रिटिश सरकार किती आटोकाट प्रयत्न करत होते ते पाहण्यासारखे आहे. मुंबई सरकारच्या उपरोल्लेखित प्रकाशनातच पुढील तीन नोंदी आढळतात. –
१) गणेश दामोदर सावरकर व विनायक दामोदर सावरकर यांना शिक्षेत कोणतीही सूट देण्यात येऊ नये अशी शिफारस मुंबई सरकार करत आहे. (पृ.४६७)
२) सार्वजनिक शिक्षामाफीचा कोणताही लाभ सावरकर बंधुंना मिळू नये याच्याशी दिल्ली सरकार पूर्णपणे सहमत आहे. – ८ डिसेंबर १९१९, पृ. ४६९.
३) मुंबई सरकारच्या गृह खात्याचे पत्र क्र. ११०६/३६ दि.२९ फेब्रुवारी, १९२१ – सावरकर बंधुंना अंदमानातून भारतात पाठवण्यात येऊ नये असे गव्हर्नर कौन्सिलचे मत आहे. कारण तसे केल्यास त्यांच्या सुटकेसाठीच्या चळवळीला बळ मिळेल.
सावरकरांच्या गळ्यात जो बिल्ला होता त्यावर Dangerous धोकादायक कैदी म्हणून D हे अक्षर कोरलेले होते, ते उगाच नाही.
१९१३ साली सावरकरांनी सुटकेसाठी जे आवेदन दिले त्याबाबत सावरकरांचे विरोधक जाणूनबूजून दिशाभूल करत असतात. आपल्या आवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये यासाठी व्यक्तिश: आपल्याला वगळून बाकी सर्व बंदिजनांची सुटका करण्यात यावी असे सावरकरांनी या आवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट दृष्टीआड केली जाते. सप्टेंबर १९१४ मध्ये केलेल्या आवेदनातही सावरकरांनी पुन्हा या मुद्यावर भर दिला होता.
तुरूंगातून सोडल्यावरही ब्रिटिश सरकारने सावरकरांना १२ वर्षे रत्नागिरीसारख्या आडगावात स्थानबद्घ ठेवले. त्यांचे बंधु नारायणराव यांच्या श्रद्धानंद या नियतकालीकावर बंदी घातली. शिवाय सावरकरांची जप्त केलेली मालमत्ता ब्रिटिश सरकारने त्यांना कधीही परत केली नाही.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी सावरकरांनी भारतमंत्री मॉंटेग्यू यांना आपल्या सुटकेचे आवेदन करताना खालील प्रस्ताव सुचवला
१) ब्रिटिशांनी भारताला साम्राज्यांतर्गत स्वयंशासनाची सवलत द्यावी.
२) त्याबदल्यात सर्व भारतीय क्रांतिकारक सशस्त्र लढयाचा मार्ग सोडून ब्रिटिशांना महायुद्धात सहाय्य करतील.
ब्रिटिशांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला हे सांगावयाला नकोच !

सावरकर इंग्रजांची क्षमा मागून अंदमानातून सुटले! नुसती क्षमा मागून नाही तर "मी राजकारणात भाग घेणार नाही व माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे" अशी सपशेल शरणागती पत्करून सुटले व ह्याचे पुरावे नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' उपलब्ध आहेत. (पहा: Far from heroism - The tale of 'Veer Savarkar by Krishnan Dubey and Venkitesh Ramakrishnan, 7 Apr 1996, Frontline)

ज्याव्यक्तीने सावरकर चरित्र अभ्यासले आहे किंवा निदान 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र वाचले आहे त्यांना ह्या आरोपातील फोलपणा त्वरीत लक्षात येईल. “काराग्रुहात राहून जी करता येत आहे त्याहून काही तरी अधिक प्रत्यक्ष सेवा या आमच्या मात्रुभूमीची करता येईल अशा प्रकारच्या कोणत्याही अटी मान्य करून मुक्तता करून घेणे हे प्रतियोगी धोरणानेच नव्हे तर समाजहिताचे द्रुष्टीनेही आमचे परम कर्तव्य आहे.” (माझी जन्मठेप: भाग २, लेखक: वि.दा. सावरकर, पृष्ठ क्रमांक: १६१, online आव्रुत्ती) व तसेच “अंदमानात जे काय राष्ट्रहित साधता येईल ते इतके महत्त्वाचे कधीही नसणार की जितके मुक्तता झाल्यास हिंदुस्थानात येऊन साधता येईल; परंतु म्हणून मुक्ततेसाठी वाटेल ते विश्वासघातक, निंद्य, नीच आणि देशाच्या किंवा जातीच्या स्वाभिमानास कलंक लागेल, असे लाळघोटी वर्तन त्यामुळे समर्थनीय ठरणार नाही. कारण त्यायोगे होणारी मुक्तता ही राष्ट्रास अधिक हितकारक होण्यापेक्षा स्वतःचे उदाहरणाने अधिक अनीतिमान आणि राष्ट्र्घातकी मात्र होणारी होती.” (कित्ता-२, पृष्ठ: १०९) अशी त्यांची मनोभूमिका होती. म्हणजे सुटकेसाठी वाट्टेल त्या देशविघातक-देशद्रोही अटी त्यांनी मान्य केल्या नाहीत.
सावरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. अफजलखानवधा आधी, सिद्दी जोहारच्या वेढ्याच्यावेळी, आग्र्यातील बंदीवासाच्यावेळी त्यांनी अशीच शत्रूला बेसावध करणारी पत्रे पाठवली होती, तसेच पुरंदरच्या तहावेळी महाराजांनीही अशीच वेळप्रसंगी औरंगजेबापुढे शरणागती पत्करली, त्याच्या मानहानीकारक अटी मान्य केल्या व पुढे सामर्थ्य प्राप्त होताच प्रतिशोध घेतला. ही एक राजकीय कूटनीति होती. व्हिएतनामच्या कम्युनिस्ट 'हो-चि-मिन्ह'नेसुद्धा चीनच्या कोमिंग्टांग कारागृहातून अशाच प्रकारचे पत्र व सहकार्याची अट मान्य करून सुटका करून घेतली होती. मार्शल चांगला त्याने कोमिंग्टांग शासनाच्या आधाराने इंडोचायनात स्थापन झालेल्या 'डाँग-मिन्ह-होई' (जी 'हो-चि-मिन्ह'च्या 'व्हिएत-मिन्ह'ला शह देण्यासाठी स्थापिली होती) या संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली व सुटका करून घेतली. (व्हिएतनाम: अर्थ आणि अनर्थ, लेखक: वि. ग.कानिटकर, मनोरमा प्रकाशन १९९८, पृष्ठ क्रमांक ५३)
पहिले महायुद्ध १९१४ ला सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले, ते पत्र मुळातूनच वाचावे, मी त्याचा मुख्य आशय उधृत करतो:“हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी, वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत व त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात सहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या व ‘युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपले अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश 'राजद्रोही' बंदीही सुटले होते’ अशी उदाहरणेही दिली होती. तसेच मला सोडता येत नसेल तर सरकारने मला न सोडता अंदमानतल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अटकून पडलेल्या राजबंदीवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल." अशी निस्वार्थी मागणीही केली होती. (कित्ता-२, पृष्ठ:४५-४६) म्हणजे सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने होत्या वैयक्तिक स्वार्थाकरिता नव्हत्या.
सावरकरांना ह्याची जाणीव होती की काही झाल तरी ब्रिटीश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत व राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मग ‘कारागारीय अन्वेक्षेक मंडळा’पुढे त्यांनी अशी भूमिका मांडली-- "राजकारण करू देत नसाल तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन, हित करण्यास झटेन. बरे मी ते वचन मोडले तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल.(कित्ता-२, पृष्ठ:१११). तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी ह्याचे सुतोवाच केले होते, त्याचा सारांश असा: "काही अवधीपर्यंत राजकारणात - प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागारातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही. परंतु बाहेर राजकारणव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाड्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती, युद्ध चालू आहेतो प्रत्यक्ष रणात उतरू नये, 'धरीना मी शस्त्रा कदनसमयीं या निजकरी' अशी यदुकुलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर (on Parole), सोडण्यात येतच असतात. आणि त्या यदुकुलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला तरी राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात." (कित्ता-२, पृष्ठ:१६२) ह्यानुसार सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त शुद्धी, समाजसुधारणा, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड समाजकारण केले.
जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले त्यातील बहुतंशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. "मी यावर पुन्हा कधीही - किंवा अमुक वर्षे - राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन! (कित्ता-२,पृष्ठ:१२०)
सावरकरांचे जे पत्र 'क्षमापत्र' म्हणून दाखवतात ते पाहण्यासाठी नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जायची आवश्यकता नाही. ते पत्र 'अंदमानच्या अंधेरीतून' ह्या पुस्तकात ‘पत्र ८ वे- दिनांक ६-७-१९२०’ शीर्षकाखाली छापलेले आहे.(इंग्रजांना पाठविलेल्या आवेदनाचा मूळ दिनांक २-४-१९२०).हा पहा त्यातील मुख्य गाभा:
हिंदुस्थानातील वरिष्ठ कार्यकारी मंत्रिमंडळाच्या सभासदासारख्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांनी मला आणि इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा टाकला होता - "तुम्ही पूर्वीच्या हिंदी राज्याच्या विरूद्ध उठावणी केली असती तर तुमची स्थिती काय असती? ते विद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवीत!" त्याला माझ्याकडून उत्तरही मिळाले होते. हिंदुस्थानातच काय, जगाच्या कोणत्याही देशात - प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये सुद्धा - विद्रोह्यांना कधी कधी असली भयंकर शिक्षा भोगण्याचे दैवी येई. पण मग इंग्रज लोकांनी युद्धाच्या वेळी जर्मन लोक आमच्या बंद्यांना वाईट रीतीने वागवतात आणि त्यांना रोटी आणि लोणी देत नाहीत अशा कोल्हेकुईने जगाच्या कानठळया का बसवाव्या? एक काळ असा होता की ज्या वेळी काराग्रुहातील बंद्यांची जिवंतपणी कातडी सोलीत आणि त्यांना मोलॉक, ठॉर किंवा असल्याच युरोपातील युद्ध देवतांना बळी देत असत" अशी आठवण दिली. खरी गोष्ट अशी आहे की, ही जी जगाच्या संस्कृतीत मनुष्यप्राण्याने सुधारणा घडवली आहे ती सर्व राष्ट्रांतील मनुष्याचे प्रयत्नांचे संकलित फळ आहे आणि म्हणून तिच्यावर सर्व मनुष्यजातीचा वारसा आहे व तिचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे; आणि मनुष्यभक्षक जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देत किंवा चौकशीचे जे नाटक करीत त्यापेक्षा अधिक चांगली पद्धती या सरकारची आहे या प्रशस्तीपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर त्याला माझी ना नाही. पण त्यावेळीच हेही विसरता कामा नये की, पूर्वीच्या काळात राजे विद्रोह्यांना जसे जिवंत सोलीत त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जिवंत जाळीत! आणि इंग्रजी जनतेने मला किंवा इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने म्हणजे थोड्या रानटीपणाने वागवले असेल तर त्यांनाही आश्वस्त असावे की परिस्थितीची उलटापालट होऊन हिंदी क्रांतिकारकांची तशी पाळी आली तर त्यांच्याकडून त्यांनाही असेच अत्यंत दयेच्या रीतीने वागविण्यात येईल!

तसेच असाही आरोप केला जातो की, सर्वांनी अमान्य केलेला माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा निर्बंध सावरकरांनी स्वीकारला. सावरकरांनी काही सुचना केल्या होत्या व त्या मान्य झाल्या तरच तो मान्य असेल असे सांगितले होते. पुरावा म्हणून सावरकरांनी माँटेग्यू आणि गव्हर्नर जनरलला लिहिलेले आवेदनपत्र वाचा: “सरकार खरोखरीच दायित्वपूर्ण शासनाधिकार म्हणजे कमीत कमी वरिष्ठ विधिमंडळात परिणामकारक बहुमत ज्यावर अर्थातच तो एखादा राज्य-समिती (Council od State) चा दगडोबा प्रत्येक वरात शाप मिसळविण्यासाठी स्थापिलेला नाही, असे लोकपक्षीय प्रतिनिधींचे बहुमत देणार असेल आणि या अधिकारदानासहच अशेष राजबंदीवानांस, युरोप आणि अमेरिका इत्यादी ठिकाणी अडकून पडलेल्या आमच्या निर्वासितांसह सर्व राजदंडितांस मुक्त करण्याचे औदार्य दाखवीत असेल तर निदान मी तरी - आणि मजप्रमाणेच इतर कित्येक - अशी राज्यघटना प्रामाणिकपणे स्वीकारीन आणि जर आमच्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून आम्हास निवडणे योग्य वाटले तर त्याच विधिमंडळाच्या सभांगणात आमच्या आयुष्याच्या परमध्येयासाठी आम्ही झटू की ज्या विधिमंडळांनी आजपर्यंत आमच्याविषयी केवळ द्वेषच काय तो धारण केला आणि त्यांच्या कार्याविषयी आणि धोरणाविषयी आमच्या मनात तिरस्कार उत्पन्न करून ठेवला.”(कित्ता-२, पृष्ठ:८२) ब्रिटिशांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला हे सांगावयाला नकोच!
सावरकर शत्रूला फसवायचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीश न फसता स्वकीयच फसले. कधीही कुठलाही ठराव, आवेदन अशा प्रकारची राजकीय पत्रे वाचताना 'दोन ओळींमधील' (between the lines) वाचता आले पाहिजे, जे सावरकरांच्या पत्रावर आक्षेप घेतात ते एकतर 'दोन ओळींमधील' वाचण्यास सक्षम नसतात किंवा 'दोन ओळींमधील' वाचण्याची त्यांची तयारीच नसते. सावरकरांच्या ह्या अटी, ही आवेदनपत्रे, ह्यामागील राजकीय खेळी, मनोभूमिका स्वत: सावरकरांनी कधीही लपवून ठेवली नाहीत. सावरकरांचे आत्मचरित्र 'माझी जन्मठेप' मध्ये ह्या सर्वाचा सांगोपांग उहापोह केलेला आहे. त्यामुळे आम्ही नवी दिल्लीच्या 'शासकीय अभिलेखागारात' जाऊन संशोधन करून पत्र शोधून काढली किंवा र.चं. मुजुमदार (R.C. Majumdar) ह्यांनी शोध लावला अशा फुशारक्या कोणी मारू नयेत.
TOP
अंदमानात सावरकरांची प्रकृती ढासळल्याने सरकारने त्यांना भारतात परत पाठवले हे खरे आहे का ?

ब्रिटिश शासन सावरकर बंधुंच्या प्रकृतीबाबत पूर्णपणे बेफिकीर होते आणि त्यांना व अन्य राजबंद्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचारही पुरवण्यात येत नव्हते. बाबाराव सावरकरांना तेथे विशेष छळ सोसावा लागला. पण ब्रिटिशांनी सावरकर बंधुंना भारतात परत पाठवले ते त्यांची प्रकृती ढासळल्यामुळे नव्हे तर ब्रिटिशांना अंदमानचा तुरूंगच बंद करावयाचा होता म्हणून. ही खरी वस्तुस्थिती आहे. अंदमानातील दुरवस्थेबद्दल भारतात जनमत प्रक्षुब्ध होत चालले होते हे त्यामागील कारण आहे.

सशस्त्र लढयावर सावरकरांचा कोणता प्रभाव पडला ?

१९०५ साली सावरकरांनी यंग इटलीच्या धर्तीवर अभिनव भारत ही सशस्त्र क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. अगदी स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत अनेक काँग्रेस नेतेही या संघटनेचे सदस्य होते. त्यात मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खरे, मध्य प्रांताचे मुख्यमंत्री रवीशंकर शुक्ल, पंजाबचे मुस्लीम लीगचे मुख्यमंत्री सिकंदर हयात खान इत्यादींचा समावेश होता. काँग्रेसचे एकेकाळचे अध्यक्ष आचार्य कृपलानी हेही अभिनव भारताचे सदस्य होते.
सावरकरांच्या प्रेरणेने अनेक युवकांनी क्रांतिकार्याचा मार्ग पत्करला. त्यात खुदीराम बोस (१९०८), मदनलाला धिंग्रा (१९०९), अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे (१९१०). बाल मुकुंद, अवध बिहारी, अमीरचंद आणि वसंत विश्वास (१९१५), भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव (१९३१), उधम सिंग (१९४१) इत्यादींचा उल्लेख करता येईल. यापैकी अनेकांनी हसत हसत फाशीची शिक्षा पत्करली. ब्रिटिश अधिका-यांनीही त्यांच्या मनोधैर्याची आणि लाखो देशवासियांना त्यापासून मिळालेल्या प्रेरणेची प्रशंसा केली आहे.
इतर अनेकांना काळ्या पाण्याची कठोर शिक्षा झाली. बाबारावांना झालेल्या शिक्षेचे महत्व तर एवढे मोठे हेते की स्वत: व्हाइसरॉय मिंटोने तत्कालीन भारतमंत्र्यांना लंडनला तार करून ही वार्ता कळवली होती ! रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत वीर सावरकरांची भेट भगत सिंग व राजगुरू यांनी गुप्तपणे घेतली होती. १९४३ साली सुभाषचंद्र बोस हेही सावरकरांना मुंबईत गुप्तपणे भेटले होते. सावरकरांच्याच सल्ल्यानुसार सुभाषबाबू भारतातून निसटून गेले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.

भारतीय स्वातंत्र्यलढयात सावरकरांचे योगदान काय ?

१) १९०० च्या प्रारंभी जेव्हा वासाहतिक स्वराज्याची कल्पनाही कोणाला सुचली नव्हती तेव्हा सावरकरांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी उघडपणे केली. १९२९ साली लाहोर काँग्रेस अधिवेशनात अध्यक्ष जवाहरलाला नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला तेव्हा खुद्द गांधीजींनी त्याला विरोध केला होता ते लक्षणीय आहे.
२) स्वातंत्र्य हे लढा करूनच मिळेल, वाटाघाटींनी नव्हे हेही सावरकरांनीच प्रथम निर्भयपणे सांगितले होते.
३) मित्रमेळा, अभिनव भारत, स्वतंत्र भारत यासारख्या क्रांतिकारक संघटनांची स्थापना सावरकरांनी केली. अभिनव भारत संघटनेची सदस्यतेची शपथ ब्रिटिश गुप्तहेर खात्याने अद्याप जपून ठेवली आहे ! त्यात संपूर्ण राजकीय स्वातंत्र्याचा उल्लेख स्पष्ट शब्दांमध्ये करण्यात आला आहे.
४) १९०५ साली सावरकरांनी ते महाविद्यालयीन विद्यार्थी असताना, देशात सर्वप्रथम विदेशी कपडयांची जाहीर होळी पुण्यात केली. गांधीजींनी तेव्हा या होळीचा निषेध केला. परंतु १९२१ साली त्यांनीही विदेशी कपडयांची होळी केली.
५) १८५७ चा उठाव हे स्वातंत्र्ययुद्ध होते, अशी घोषणा सावरकरांनी केली व ते केवळ शिपायांचे बंड नव्हते, हे स्पष्ट केले.
६) सावरकरांनी रशिया आणि आयर्लंडमधील क्रांतिकारकांशी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेशी संपर्क प्रस्थापित केला होता.
७) आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून आणि पुढे हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपल्या सुटकेचे प्रकरण नेऊन सावरकरांनी भारतातील सशस्त्र लढयाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी व पाठबळ मिळवून दिले.
८) स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना सावरकरांनीच पुरस्कृत करून तो राष्ट्रध्वज मादाम कामा यांचे हस्ते स्टटगार्ड परिषदेत फडकावला.(१९०७)
९) क्रांतिकार्यात मग्न असतानाच सावरकरांनी स्वतंत्र भारताच्या संविधानाविषयीही चिंतन केले आणि स्वतंत्र भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र असावे असे प्रतिपादन केले.
१०) सावरकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे असंख्य तरूणांना स्वातंत्र्यलढयाची व देशभक्तीची प्रेरणा मिळाली.
११) कोणतीही परकीय सत्ता ही स्थानिक सैनिकांच्या निष्ठेवर अवलंबून असते. हे सावरकरांनी सर्वप्रथम हेरले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी शीख सैनिकांना क्रांतिकार्यासंबंधीची पत्रके गुप्तपणे पाठवली. यासाठी त्यांनी गुरूमुखी लिपीचा आणि शीख पंथाच्या इतिहासाचा सखोल अभ्यास केला. दुस-या महायुद्धाच्या काळात भारतीय तरूणांना सैन्यात भरती होण्याचा आग्रह त्यांनी याच भूमिकेतून केला. देशाबाहेर जाऊन सशस्त्र सेना उभी करण्याची प्रेरणा त्यांनीच सुभाषबाबूंना दिली. सावरकरांच्या सैन्य भरतीच्या मोहिमेमुळेच आझाद हिंद सेनेसाठी आपल्या प्रशिक्षित सैनिक मिळाले असे.