समाजसुधारणा
   

स्वातंत्र्यवीर सावरकर एक श्रेष्ठ समाजसुधारक होते. राजकारण व समाजकारण सारख्याच महत्वाचे हे मानणार्‍या, प्रचारणार्‍या व प्रत्यक्ष कार्य करणार्‍या फार थोड्या पुरुषांत सावरकर एक होते. सावरकरांनी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य या दोन्ही साधनांनी समाजसुधारणा केली. रत्नागिरीत स्थलबद्ध असताना व राजकीय कार्यावर प्रतिबंध असताना सावरकरांनी प्रामुख्याने समाजसुधारणेची चळवळ केली. तथापि क्रांतीकारक व पुढे राजकीय कार्य करतानादेखील त्यांनी समाजसुधारणेचा कृतिशील पुरस्कार केला हे लक्षात घेतले पाहिजे. सावरकरांची समाजसुधारणेची चळवळ हिंदू संघटनेच्या चौकटीत सामावलेली होती ही टीकाही अनाठायी आहे. समाजहिताच्या व मानवहिताच्या बुद्धीने सावरकरांनी अत्यंत निरलसपणे समाजसुधारणा केली हे लक्षात घेतले पाहिजे. “मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका”, असे सावरकर सांगत. आपल्या आयुष्यातील अत्यंत स्फूर्तिदायक व रोमहर्षक घटनेपेक्षा सावरकरांना आपल्या समाजिक सुधारणाविषयक कार्याचे महत्व अधिक वाटत होते. सन १९२४ ते १९३७ हा काळ त्यांच्या आयुष्यातील ‘समाजसुधारक’ या पैलूचा होता असे स्थूलपणाने म्हणता येईल.


Download Document