सशस्त्र क्रांती
   

‘क्रांतीकारकांचे मुकुटमणी’ असा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला जातो. ब्रिटिशांच्या परदास्यातून भारताची मुक्तता करण्याचे श्रेय हे सशस्त्र किंवा निःशस्त्र अशा कोणत्याही पक्षाचे नसून ते सर्व पक्षांच्या सर्व स्वदेशनिष्ठांचे सामायिक श्रेय आहे असे सावरकरांचे सांगणे होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या साधनांचा विचार केल्यावर सावरकर, “रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले। स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।“ या निष्कर्षाप्रत आले. हिंदुस्थानचे राजकीय ध्येय संपूर्ण स्वातंत्र्य हेच आहे हे सावरकरांनी ‘मित्रमेळा’ या आपल्या क्रांतीकारक संस्थेच्या विद्यमाने सन १९०० च्या सुमारास मोठ्या धैर्याने घोषित केले. हिंदुस्थानचे संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यास सशस्त्र क्रांती हाच मार्ग असल्याचा विचार सावरकरांनी केला. आपल्या क्रांतीकारक भाषणांतून व लेखनातून त्यांनी हिंदुस्थानात सशस्त्र क्रांती कशी घडवून आणता येईल याचा आराखडा मांडला. त्यांनी स्वतः हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट भोगले. सन १९११ साली त्यांना दोन जन्मठेपींची, पन्नास वर्षांची शिक्षा देण्यात आली व त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. सावरकर हे सशस्त्र क्रांती आणि स्वातंत्र्य यांचे द्रष्टे, उद्गाते, कवी, शाहीर, स्तोत्रकार, वीर व सेनापती होते. सन १८९७ ते १९२४ हा काळ त्यांच्या आयुष्यातील ‘सशस्त्र क्रांती’चा कालखंड होता असे स्थूलपणाने म्हणता येईल.