आपल्या भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या उष:कालाचा आरंभ न्यूनत: पाच सहस्र वर्षांपासून दहा सहस्र वर्षांपर्यंत तरी आजच्या संशोधनानुसार प्राचीन आहे. चीन, बाबिलोन, ग्रीस प्रभृती कोणत्याही प्राचीन राष्ट्राच्या जीवनवृत्तान्ताप्रमाणे हा आपला प्राचीन राष्ट्रीय वृत्तान्तही पुराणकालात मोडतो. म्हणजे त्यात असलेल्या इतिहासावर दंतकथेची, दैवीकरणाची आणि लाक्षणिक वर्णनाची पुटेच पुटे चढलेली आहेत. तरीही ही आपली जुनी 'पुराणे' आपल्या प्राचीन इतिहासाचे आधारस्तंभच आहेत हे विसरता कामा नये. हे प्रचंड 'पुराण-वाङ्मय' आपल्या साहित्याचे, ..