मी सन्यस्त खड्ग का लिहिले?
   

दिनांक: १६ जानेवारी १९५४
स्थळ: शिवाजी मंदिर, दादर, मुंबई

सावरकर हे एक प्रतिभासंपन्न नाटककार होते. रत्नागिरीतील स्थानबध्दतेच्या काळात सावरकरांनी उ:शाप (१९२७), सन्यस्त खड्ग (१९३१) व उत्तरक्रिया (१९३२-३३) ही संगीत नाटके लिहिली. संगीत सन्यस्त खड्ग नाटकाचा पहिला प्रयोग बळवंत संगीत मंडळींनी मुंबईच्या ग्रँट मार्गावरील एलफिस्टन नाट्यमंदिरात शुक्रवार दिनांक १८ सप्टें १९३१ ला सादर केला. संगीत सन्यस्त खड्ग नाटक गौतम बुध्दाच्या काळाशी संबंधित आहे. गौतम बुध्दांच्या सांगण्यावरून 'शाक्य' सेनापती विक्रमसिंह शस्त्रत्याग करून संन्यासी होतो. बुध्दांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन 'शाक्य' जनता शस्त्रत्याग करते व त्यामुळे त्यांचे राज्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होते. जेव्हा शेजारील कोसल राजा 'शाक्य' राज्यावर आक्रमण करतो तेव्हा विक्रमसिंहाचा पुत्र वल्लभाच्या सेनापतीत्वाखाली असलेले शाक्य सैन्य परराज्याचे आक्रमण रोखण्यास असमर्थ ठरते. विक्रमसिंहाची सून सुलोचना सैनिकी वेष धारण करून रणांगणात उतरते. पण दोघांचाही शेवट सारखाच होतो. शेवटी त्रस्त शाक्य भूतपूर्व सेनापती विक्रमसिंहाकडे जातात. गौतम बुध्दाशी अहिंसा व नैतिकता ह्यावर वाद-विवाद केल्यानंतर विक्रमसिंह त्याग केलेली तलवार (सन्यस्त खड्ग) उपसून शाक्यांना विजयी करतो. नाटक त्यातील अहिंसाविषयक तत्वज्ञानावरील वाद-विवाद व सावरकररचित गीतांमुळे संस्मरणीय ठरते.

स्वरचित सन्यस्त खड्ग नाटकाची पार्श्वभूमी सावरकरांच्याच मुखातून ऐका.