जीवनपट
   

हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झुंजण्याचा संकल्प बालपणीच करणारा व त्यानुसार अपार कष्ट भोगणारा वीर देशभक्त, मनुष्यजातीचे कल्याण हेच अंतिम उद्दिष्ट असणारा राष्ट्रवादी, मूलग्राही व कृतिशूर विचारवंत, विज्ञाननिष्ठ व उपयुक्ततावादी समाजसुधारक, महाकाव्याचा नायक शोभावा असा महाकवी, इतिहास घडविणारा इतिहासकार, आपल्या प्रत्येक ग्रंथालाच इतिहास असणारा साहित्यिक, अमोघ वक्ता! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे व्यक्तिमत्व अक्षरशः शतपैलू आहे. अनेक श्रेष्ठ गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रकर्षाने झाला होता. हे सर्व गुण त्यांनी इतिहासाच्या ज्ञानप्रकाशाने प्रकट केलेल्या व डोळसपणे स्वीकारलेल्या दिव्य व दाहक व्रताची सांगता करण्यासाठी त्यांनी मातृभूमीला समर्पित केले हे त्यांचे वैशिष्ट्य! त्यांचे उभे आयुष्य म्हणजे त्यांच्या वेळोवेळीच्या तत्वज्ञानाचा, युगप्रवर्तक घोषणांचा, धाडसी हालचालींचा, शूर कृत्यांचा, त्यागाचा आणि हालअपेष्टांचा विस्मयकारक चित्रपटच होय!