वाहत्या नदीत काठी आपटली असता त्या नदीच्या अखंड धारेचे पळभर दोन भाग झालेले भासतात. संध्याकाळी अंधुकलेल्या अखंड आकाशात मध्येच कुठे जी पहिली चांदणी लुकलुकू लागते ती तशी चमकण्यासरशी ह्या अखंड आकाशाला एक गणनबिंदू मिळून त्याच्या चारीकडे चार बाजू चट्कन वेगळ्या झाल्याशा भासतात.
ह्या पदार्थजगतातही मनुष्याच्या जाणिवेची चांदणी चमकू लागताच त्याचे अकस्मात् दोन भाग पडतात. उभे विश्व, अनंताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चरकन् कापले जाऊन दुभंग होऊन पडते. सुरूप आणि कूरूप, सुगंधी आणि दुर्गंधी, मंजुळ आणि कर्कश, ..