साहित्य
   

सावरकरांच्या संकलित कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तेजस्वी व्यक्तीमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. दिक्कालाला भेदून भविष्याचा वेध घेणारा प्रतिभासंपन्न महाकवी, आशयसंपन्न निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारीत कादंब-यांचा लेखक, रक्ताच्या शाईत बुडवून विद्युलतेच्या लेखणीने लिहीणारा व उज्ज्वल भूतकाल व श्रेष्ठ परंपरांचे ज्ञान घेऊन राष्टभक्तीचा स्फुल्लींग चेतविणारा ग्रंथकार, अतीत कालातील घटनांचा अन्वयार्थ उलगडून दाखविणारा द्रष्टा इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. जी सावरकरांची प्रतिभा अग्निकण उधळते तीच काव्यपुष्पेही उधळते. मराठीत वीररस प्रकर्षाने आणण्याचे श्रेय सावरकरांना जाते. सावरकरांचे भावोत्कट साहित्य प्रत्यक्ष अनुभूतीतून साकारलेले आहे. सावरकरांनी ज्या ज्या वेळी कृतीसाठी पाऊल टाकले, त्यांच्या बंडखोर मनात ज्या संवेदना उमटल्या, त्यांच्या कविमनाचे जे जे सौंदर्यग्रहण केले, त्या सर्व गोष्टी त्यांच्या साहित्यातून जगापुढे मांडल्या.

सावरकरांचे पहिले काम म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका । सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी । शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.

निबंधकार सावरकर हे तर्ककठोर, घणाघाती, अभ्यासपूर्ण, पल्लेदार शैलीमुळे अजरामर आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.
उत्तरक्रिया, सन्यस्त खङग, उःशाप या त्यांच्या नाटकांत नाट्याचे व तेजस्वितेचे रंग लीलेने मिसळून गेले आहेत. ही नाटके एखाद्या चढाईखोर व्याधासारखी वाटतात.
काळेपाणी, व मला काय त्याचे या त्यांच्या कादंब-यांतून त्यांनी आत्मानुभव सांगणारे व उपदेशात्मक आहेत. सावरकरांच्या गोष्टी व समाजचित्रे हे त्यांचे कथासंग्रह वाचनीय आहेत. त्यांचे अनेक स्फूट लेख आणि पत्रके तत्कालीन समाजचित्रण करतात.
सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, हिंदुपदपातशी व सहा सोनेरी पाने हे त्यांचे इतिहासविषयक ग्रंथ. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. विषयाचा व्यासंग, स्वतंत्र दृष्टीकोन, विश्लेषक बुद्धी, डोळस स्वाभिमान आणि वस्तुनिष्ठ, साधार व स्फूर्तीदायक विवेचन ही त्यांच्या इतिहास ग्रंथांची वैशिष्ट्ये.
सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा,दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, दूरदर्शन, ध्वनीक्षेपक, अर्थसंकल्प, विधीमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्त वेतन, महापौर, हुतात्मा उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.
मराठी सारस्वतांमध्ये सावरकरांचे स्थान अढळ आणि अद्वितीय आहे.