क्रांती
   

'क्रांती' या विषयावरील सावरकरांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत संदर्भासहित येथे दिलेले आहेत.

क्रांती - एक प्रयोग


प्रत्येक क्रांती हा एक प्रयोग असतो. - (१९३६ क्ष.कि. स.सा.वा. ३ : २०६ )


क्रांती व उत्क्रांती ह्यांचा परस्परसंबंध


विश्वनियमानुसार क्रांती व उत्क्रांती यांचे प्रवाह अखंड व सतत वाहत असतात. कालाच्या उतरणीवरुन अकल्पनीय जोराने आपटत कोसळणार्‍या प्रपातांना क्रांती म्हणतात व समप्रदेशावर वाहत जाणार्‍या नदीप्रमाणे विश्ववृत्तीचे जे प्रगमनात्मक मंदौघ त्यांना उत्क्रांती म्हणतात. क्रांती व उत्क्रांती ही एकमेकांची कार्ये व कारणे होत. क्रांतीतून उत्क्रांती व उत्क्रांतीतून क्रांती उत्पन्न होणे हे उत्क्रांती - क्रांतिचक्र कालचक्राच्या आरंभापासून गतिमान झालेले आहे. - (१९०६ लं.बा., स.सा.वा. ४ : ४९)


क्रांतीच्या उगमाचा शोध घ्या


..ऐतिहासिक क्रांतीच्या इतिहासलेखकाने त्या क्रांतीतील वरवर असंबध्द दिसणार्‍या प्रसंगांना किंवा तिच्या अद्भुततेला पाहून तिथेच स्तिमित होऊन न बसता तिच्या उगमाकडे शोध करीत गेले पाहिजे. इतकेच नव्हे तर , त्या शोधात भलत्याच व आकस्मिक निघालेल्या फाटयांस सोडून अगदी मूलतत्वांपर्यंत शोध लावला पाहिजे, व मग त्या तत्वाची दुर्बिण घेऊन त्या क्रांतीच्या विस्तीर्ण प्रदेशाचे निरीक्षण केले पाहिजे. अशा रीतीने आरंभ केल्यास अनेक असंबध्द प्रसंगात पूर्ण संबध्दता दिसू लागते, वक्ररेषा सरळ भासू लागतात व सरळ रेषा वक्र भासू लागतात... - (१९०७ स.स्वा.,स.सा.वा. ८ : २७)


वर्णनापेक्षा विवरण महत्वाचे


... मूल शक्तीच्या विवरणाशिवाय त्या क्रांतीचे खरे रहस्य कधीही लक्षात येणारे नसल्याने इतिहासशास्त्रात नुसत्या वर्णनापेक्षा मूलविवरणालाच अधिक महत्व दिलेले आहे. - (१९०७ स.स्वा., स.सा.वा. ८ : २६)


स्वातंत्र्येतिहासाची पारायणे करा


... रामकथेची किंवा कृष्णकथेची जशी पारायणे आपण करतो तशीच स्वातंत्र्य लक्ष्मीच्या इतिहासपुराणांचीही पारायणे आम्ही केली पाहिजेत. जशी धार्मिक संध्या प्रत्यही केली पाहिजे तशीच ही संध्या - राष्ट्रीय संध्या. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १: १९४)


पराक्रमाबरोबर दिव्य ध्येय व युध्दकौशल्यही हवे


एकटा पराक्रम काही मृत राष्ट्र जिवंत करु शकत नाही; काही स्वातंत्र्य मिळवीत नाही, तर त्या पराक्रमास कोणत्या दिव्य ध्येयाचे आणि युध्दकौशल्याचेही साहाय्य हवे असते. - (१९२७ र.शिं., स.सा.वा. २ : ३७५)
राष्ट्रीय सैन्याचे मुख्य ध्येय विजय
... राष्ट्रीय सैन्याचे मुख्य ध्येय विजय हे आहे. आपल्या न्याय्य पक्षाची एकंदरीत कमीत कमी हानी होऊन अन्याय्य विपक्षाची एकंदरीत जास्तीत जास्त हानी करण्यास जी युध्दकला झटते ती खरी युध्दकला होय ! त्या युध्दकलेला हुतात्मता हाही केव्हा केव्हा एक अत्यंत अवश्य आणि अत्यंत वंद्य असा घटक होऊ शकतो. पण तो अपवाद म्हणून. केवळ हौंतात्म्य ही काही विजयाची निश्चित हमी नव्हे ! - (१९२९ ते.ता., स.सा.वा. २ : ४९४)


अनावश्यक प्राणदान अनुकरणीय नव्हे


... ध्येयार्थ अत्यवश्य असलेले प्राणदानच तेवढे सूक्त आहे. पण ध्येयार्थ अनावश्यक असलेले प्राणदान त्या वीरात्म्यांच्या देशभक्तीचे किंवा निग्रहाचे किंवा नि:स्वार्थ निर्भयतेचे द्योतक होणारे आणि म्हणूनच हेतुत: वंदनीय असणारे परंतु व्यवहारत: ध्येयाच्या अंतिम विजयास अनावश्यक नव्हे तर एका अर्थी अपायकारक होणारे आणि म्हणूनच अनुकरणीय नसणारे आहे... - (१९२९ ते.ता., स.सा.वा. २ : ४९५)


यशस्वी क्रांतीचा वणवा प्रतिशोध घेणार्‍या हौतात्म्याच्या चितेतून


... मरण ? आमच्या मातृभूमीच्या सिंहासनावर ह्या तिच्या शत्रूने चढून बसावे नि आम्ही ते जिवंत राहून पाहावे हेच आम्हांस मरणाहून असह्य वाटते. शक्य असो नसो, यश येवो वा अपयश, आम्ही आमच्यापुरता तरी ह्या देशशत्रूचा सूड उगविणार ! अशा सुडापायी जे मरण येईल त्याचेच आम्हांस ह्या पौरुषशून्य जीवनाहून अधिक आकर्षण वाटत आहे. कारण यशस्वी राज्यक्रांतीचा वणवा जेव्हा केव्हा भडकतो तेव्हा तो अशाच प्रतिशोध घेणार्‍या हौतात्म्याच्या जळत्या चितेतील आगीनेच भडकतो. आम्ही आमचे कर्तव्य करणार - मग इतर कोणी मागे येवो वा न येवो ! - (१९४९ पू.पी., स.सा.वा. १ : ३१ )


कामी आलेल्या सैनिकांची कृतज्ञ आठवण


रणात कामास आलेल्या सैनिकांची कृतज्ञपणे आठवण काढणे हे नवीन सैनिकांची भरती करण्याचे अत्यंत परिणामकारक साधन असते. -(१९२७ मा.ज., स.सा.वा. १ :५७५)
आहुती लहान व मोठी
कधी होमाच्या विस्तीर्ण स्थंडिलात तर कधी वैश्वदेवाच्या वितीएवढया कुंडात पण अग्नीची आहुती टळली नाही, म्हणून तर अग्नि जिवंत राहिला. - (१९२७ मा.ज., स.सा.वा. १ : ३८४)


संघटनेत शांतता परंतु क्रांतीत धाडस


क्रांत्या ह्या गणितातल्या बेरीज - वजाबाकीने चालत नसतात, तर हृदयातील अवसानाच्या अतर्क्य बलाने विजय पावतात. मंदतेच्या थंडपणाने त्या थंड पडतात - गतीच्या उष्णतेने त्या उष्ण राहतात. संघटना चालली असता शांतता असावी, गणित करावे, थंडपणाने कालनिश्चितता ठरवावी. परंतु एकदा शीळ फुंकली गेली की मग जीव जावो अथवा राहो अशा मारामारीने भयंकर गर्दी उडवून द्यावी. तिथे जो धरसोड करील त्याचा जीव गेलाच. तिथे उठू का नको म्हणून जो म्हणेल तो कायमचा खाली कोसळलाच. - (१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : ३९०)


अराजकतेत क्रांतीचा नाश


ज्याचे राज्य उलथून टाकावयाचे असेल त्याच्या कायद्यांना तरवारीने चिरुन टाकणे म्हणजे राज्यक्रांती होय ! परंतु एकदा परक्यांच्या कायद्याला तरवारीने चिरण्याची सवय लागली की मग त्या धुंदीमध्ये त्या सवयीचे पर्यवसान वाटेल त्या कायद्याला स्वत:च्या लहरीप्रमाणे तुडविण्याची खोड लागू शकते. दुष्ट कायद्याचा नाश करण्याचे कामी चटावलेली तरवार कायद्याचाच नाश करु शकते. परक्यांच्या अंमलाचा नि:पात करु निघालेले वीर शेवटी अंमलाचाच नि:पात करु लागतात ... अराजकता ही परराज्याइतकीच व बंधनरहितता दुष्ट बंधनाइतकीच व्यक्तीच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या नाशाला कारणीभूत होणारी आहे. ह्या समाजसत्याचे विस्मरण ज्या ज्या क्रांतीत घडू लागले त्या त्या क्रांतीचा तिच्या क्रांतित्वामुळेच विनाश झालेला आहे. -(१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ :२८६,२८७)


राज्यक्रांतीवर अढळ आसन हवे


राज्यक्रांती हा एक विचित्र पक्षी आहे. तो फार दिवसांनी पिंजर्‍यातून बाहेर पडला की इष्टस्थळी जाण्याचे आधी आकाशात इतस्तत: खूप भरार्‍या मारु लागतो. ज्याला त्या गरुडासारख्या पक्ष्यावर बसून इच्छित स्थळी जाणे असेल त्याने त्याचे पाठीवर अढळ आसन ठेवले पाहिजे. भरार्‍या मारुन मारुन एकदा त्याच्या पंखांची रग जिरली की मग त्याचे पाठीवर अजूनपर्यंत जर कोणी अढळ राहिलेला असेल तर त्याच्या पूर्ण लगामी तो येऊ लागतो. - (१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : १३३)


क्रांतिकारक युध्द केव्हा विराम पावते ?


क्रांतिकारक युध्दाला स्वातंत्र्य वा मृत्यू ह्यांवाचून दुसरा युध्दविराम माहीत नसतो. - (१९०५ स.सा.वा. ५ : ४४४)


क्रांतीची उठावणी व प्रसार ह्यांत फार अंतर नसावे


मंदपणासारखे क्रांतीला प्राणहरण करणारे दुसरे विष नाही. क्रांतीचा विस्तार जितका त्वरित व जितका आकस्मिक होईल तितका तिच्या जयाचा संभव जास्त वाटत असतो. ही विस्ताराची त्वरा शिथिल झाली म्हणजे शत्रूला संरक्षणाची संधी मिळते. जे आधी उठतात त्यांचा आपल्याबरोबर कोणी येत नाही म्हणून उत्साह घटू लागतो व जे मागून येणार त्यांच्या मार्गात मधल्या संधीचा फायदा घेणारा चाणाक्ष शत्रू अनेक विघ्ने रचून ठेवतो. म्हणून उठावणी व प्रसार यांच्यामध्ये फार वेळ जाऊ देणे हे क्रांतियुध्दला सदोदित अपायकारक होते. - (१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : १०७)


गुप्त मंडळयांचे उपयोग


... गुप्त सभा भरवून त्यांत स्वातंत्र्याचे शिक्षण स्पष्ट व उत्तम रीतीने देता येते. ते लोकांस ताबडतोब कळते व परकीय सरकारास दाबणे अशक्य होते ... दुसरा फायदा असा की, फार थोडया शक्तीने गुप्त मंडळयांना परकीय सरकारास गांगरुन सोडता येते .... तिसरा फायदा म्हणजे लढाईची तयारी करता येते. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : ११, १२)
... स्वदेशात गुप्त रीतीने हत्याने तयार करण्याचे अगदी लहान परंतु पुष्कळ व अंतराअंतरावर असे गुप्त कारखाने काढावे.
... गुप्त मंडळयांनी इतर देशांत हत्यारे खरेदी करुन ती मालाच्या जहाजांतून लपवून धाडावी. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : १७)


शासकीय सेवा व राष्ट्रीय प्रवृत्तीचे युवक


शासकीय सेवेत राष्ट्रीय प्रवृत्तीच्या युवकांनी घुसलेच पाहिजे आणि तेथे राहूनही शक्य ते ते राष्ट्रीय कार्य केलेच पाहिजे. - (१९३८ हिं.स.प.पृ. १३८)


स्वदेशी चळवळ व राज्यक्रांती


इतिहासात स्वदेशी चळवळीचे पर्यवसान राज्यक्रांतीत व स्वातंत्र्यप्राप्तीत झाल्याची ही उदाहरणे काही आकस्मिक रीतीने घडून आलेली नाहीत. ते काही अपघात नाहीत. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : ९)


सैन्याला स्वदेशाकडे वळविणे


परकीय सरकाराला तद्देशीय सैन्य ठेवल्यावाचून कोणत्याही देशावर राज्य करता येणे शक्य नसते. अशा स्थितीत लष्करी शिपायांना जर स्वदेशाकडे वळविता आले तर त्याचा दुहेरी फायदा होतो. एक तर परक्यांचा विश्वास उडून जातो व आयत्या वेळी ते घाबरे होतात; व दुसरे असे की राष्ट्रपक्षास आयते शिकलेले व सशस्त्र लोक मिळू शकतात. -(१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : १७)


गनिमी कावा


परक्यांना गनिमी काव्याचा केव्हाही आश्रय करता येत नाही... परतंत्र देशांना गनिमी युध्द फारच फायदेशीर असते. - (१९०६ मॅ.प्र., स.सा.वा. ८ : १८)
... फायदेशीर नसल्यास लढाई टाळावी. फायदेशीर असल्यास लढाई द्यावी. परंतु केव्हाही रणामध्ये भित्रेपणाने वा बेशिस्तीने बदलौकिक करुन घेऊ नये. शौर्याने अशी झुंज देत रहावी की रणात अपयश आले तरी जगात सत्कीर्तीच वाढली पाहिजे, म्हणजे शत्रूला धाक बसतो. स्वसैन्यात अनीती वाढत नाही, शिस्त सुटत नाही, उत्साह वाढू लागतो, शौर्याचा उत्कर्ष होतो, विजय हटकून मिळतो. शत्रूने आपल्याला शौर्याने जिंकले असे कधीही होऊ देऊ नये ही गनिमी काव्याची किल्ली आहे. -(१९०९ स.स्वा., स.सा.वा. ८ : ३५०)


परकीय साम्राज्यावरील संकट ती परतंत्र राष्ट्राची संधी


कोणतेही राष्ट्र जेव्हा एखाद्या परकीय बलाढय साम्राज्याच्या पारंतत्र्याच्या शृंखलेत जखडले गेले असते तेव्हा त्यास त्या शृंखला तोडून स्वतंत्र होण्यासाठी सर्व संधीत जी
अत्यंत अनुकूल संधी सापडण्यासारखी असते ती तेव्हाच होय की जेव्हा ते परकीय बलाढय राष्ट्र किंवा साम्राज्य त्याहूनही बलाढय राष्ट्र किंवा समबल अशा कोण्या अन्य शक्तीशी निकराच्या युध्दात गुंतलेले असते. -(श्रध्दा,१९२८फेब्रु.)
प्रत्येक परतंत्र राष्ट्राने आपली अंतर्गत संघटना अशा बेताने आणि इतक्या आधीपासून केली पाहिजे की त्या परकीय साम्राज्याचे दुसर्‍या कोणत्या शक्तिशाली राष्ट्राशी युध्द जुंपताच आपले साह्य ह्या किंवा त्या पक्षाला देता येण्याची समर्थता आंशिकत: त्याचे अंगी उत्पन्न झाली असली पाहिजे आणि ते सहाय्य या किंवा त्या पक्षालाही हवेसे वाटावे किंवा अपरिहार्य वाटावे इतके प्रबळ असले पाहिजे. - (श्रध्दा, १९२८ फेब्रु.)


आंतरराष्ट्रीय राजकारण


प्रत्येक परतंत्र परंतु स्वातंत्र्योन्मुख आंतरराष्ट्रीय राजकारण असतेच असते. - (१९२७ श्रध्दा, २५ सप्टेंबर)


सशस्त्र चळवळीकडे का वळलो ?


मानवता ही श्रेष्ठतर देशभक्ती असल्यामुळे जेव्हा मनुष्यजातीचा एक भाग स्वत:चे महत्व अवास्तवपणे वाढवीत आहे व एकंदर मानवाच्या जीवनासच वाढत जाणार्‍या विषारी कर्करोगाप्रमाणे धोका देत आहे असे पाहून आम्ही अस्वस्थ झालो तेव्हा इतर परिणामकारक उपाय नसल्यामुळे आम्हांला शस्त्रवैद्याचा चाकू हातात घेणे भाग पडले. हा उपाय तीव्र वाटला तरी शेवटी दयाळू होता. शक्तीचा प्रतिकार शक्तीने करीत असताना आम्ही हिंसेचा मनापासून तिरस्कार केला व आजही करतो. - (१९२० ले.अं., स.सा.वा. ५: ४९०)


आमचा माथा फिरला म्हणून तर


अखिल हिंदी लोकांचे जे ध्येय त्याच ध्येयासाठी जर आम्ही हातात शस्त्र घेतले तर आम्ही अत्याचारी झालो? तुमच्यासाठी जे लोक फासावर गेले त्यांना तुम्ही अत्याचारी व माथेफिरु म्हणता? आमचा माथा फिरला म्हणून तर हा देश फिरला आहे ! - (१९३८ स.सा.वा. ४ : ४२२)


प्रथम मानसिक क्रांती, मग वास्तविक क्रांती


कोणत्याही प्रबुध्द क्रियेचा आरंभ प्रबुध्द संकल्पातच असणार ! यास्तव अभिनव भारताच्या कार्यक्रमाचे मी प्रथमपासून मन:प्रवर्तन आणि शरीरप्रवर्तन, राष्ट्राची मानसिक क्रांती आणि मग वास्तविक क्रांती, प्रबुध्द संकल्प आणि मग प्रबळ क्रिया, मन:प्रचार आणि कृतिप्रचार अशा अनुक्रमाने विभागला होता. - (१९४९ मा.आ., स.सा.वा. १ : २५७)


अभिनव भारताचा राष्ट्रीय संकल्प


... हिंदुस्थानास स्वतंत्र करावयाचे, हिंदुस्थानास एकराष्ट्र करावयाचे, हिंदुस्थानास लोकसत्ताक करावयाचे या सूत्रांसह चवथे सूत्र हे ही घोषित केले जाई की हिंदीस राष्ट्रभाषा करावयाची, नागरीस राष्ट्रलिपी करावयाची ! - (१९२७ मा.ज., स.सा.वा. १ : ६३४)


निष्ठावन्त अल्पसंख्याक गट स्वातंत्र्य मिळवतो


इंग्रजांचे दहापाच लोक मारले की ते पळतील अशी दुधखुळी समजूत आम्ही केव्हाही करुन घेतली नव्हती. पण आमची निष्ठा असे की, तीस कोटी लोकांचे हे राष्ट्र, यातील सर्वजण जरी कधीच उठले नाहीत, उठणार नाहीत, तरी दोन लक्ष वीर जरी छाप्यांच्या पध्दतीने, गुप्त संघटनेने, गनिमी काव्याने, अखंड अदम्य, अविश्रांत वृकयुध्द लढू शकतील तरी आपले राष्ट्रीय स्वातंत्र्य संपादू शकतीलच शकतील. -(१९४९ मा.आ.,स. सा. वा. १ : २५५,२५६)


सद्य:स्थितीत राष्ट्रव्यापी सशस्त्र क्रांतीचा विचार अशक्य


जेव्हा एखाद्या परतंत्र देशाचा प्रतिपक्षी आपल्या काही प्रबळ शत्रूंशी गंभीर युध्दात अडकलेला असतो तेव्हा आपले स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी सशस्त्र उठाव करणे हा पहिला व सर्वात परिणामकारक मार्ग त्या परतंत्र देशाला सुचला असता. परंतु आपण नि:शस्त्र, असंघटित व ऐक्यहीन असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत इंग्लंडविरुध्द राष्ट्रव्यापी सशस्त्र उठावाचा विचार पूर्णपणे विचारबाह्य आहे. हिंदुसभेला, काँग्रेसला किंवा हिंदुस्थानातील इतर सार्वजनिक व प्रकट संस्थेला तिच्या घटनेनुसार व तिच्या ध्येय आणि उद्दिष्टांनुसार आखून घेतलेल्या कार्यक्षेत्रात प्रकट व्यासपीठावर कोणत्याही सशस्त्र प्रतिकाराचा प्रश्न चर्चेचा विषयसुध्दा होऊ शकत नाही. म्हणून सध्याच्या परिस्थितीत हिंदुमहासभेच्या संघटनेच्या विद्यमाने सशस्त्र प्रतिकाराचा समावेश आलेल्या कोणत्याही कार्यक्रमाचा विचार न करणे, नैतिक कारणांनी नव्हे तर व्यवहारी राजकारणासाठी आम्हांस भाग पडले आहे. - (१९४० हिं.रा.द., स.सा.वा. ६ : ४२१)


स्वातंत्र्य संपादनानंतर क्रांतिप्रवृत्तीचे विसर्जन


परसत्तेच्या आपत्तीतून आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य-संपादन करण्यास्तव प्रक्षोभ, असंतोष, उत्क्षोभ, निर्बंधभंग, शस्त्राचार, गुप्त कट इत्यादि साधने योजणारी विध्वंसक क्रांतिप्रवृत्ती त्या कालापुरतीच काय ती धर्म्य असते; परंतु जनतेत ती क्रांतिप्रवृत्ती जर तशीच मूळ धरुन राहू दिली तर केव्हा केव्हा आपध्दर्मालाच नित्यधर्म समजण्याची भयंकर भूल जनतेच्या हातून घडते आणि त्यामुळे राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतरही राष्ट्रात ही विध्वसंक बेबंदशाही तशीच चालू राहते. त्यामुळे राज्यक्रांतीनंतर घटनात्मक स्वराज्य अशक्य होऊन अपक्रांती नि अराजकता माजते.
... जेव्हा स्वातंत्र्य संपादन हे आपले प्रथम साध्य सिध्द होते तेव्हा सशस्त्र वा नि:शस्त्र प्रतिकारक जनतेत संचरविलेल्या वरील सर्व विध्वंसक क्रांतिप्रवृत्तीचे तत्काल विसर्जन करणे हे आपल्या यशस्वी झालेल्या राज्यक्रांतीचे अंतिम कर्तव्य होय. कारण आता आपले साध्य स्वातंत्र्यसंरक्षण हे आहे, राष्ट्रसंवर्धन हे आहे. आता निर्बंधतुच्छता नव्हे, तर निर्बंधशीलता, विध्वंसक नव्हे तर विधायक प्रवृत्ती, हा राष्ट्रधर्म आहे. - (१९५२ स.सा.वा. ८ : ४९६)