‘क्ष’ किरणे
   

मनुष्याच्या शरीरात खोल रूतून बसलेली किंवा बाहेरच्या स्थूल दृष्टीला न दिसता आतच बळावून आतून जीवन पोखरीत असलेली जीवनघातक बाह्य द्रव्ये वा आंतर रोगाणूंचे घाव जसे ‘क्ष’ किरणांच्या— एक्स रेज् च्या – अंतर्भेदी प्रकाशाने यथावत निरीक्षता येतात, तसेच समाजाच्या शरीरात खोल रूतून बसलेल्या सामाजिक दोषांचे अस्तित्व, स्वरूप नि परिणाम नुसत्या तात्विक विवेचनापेक्षा त्या दोषांमुळे समाजाला जी दुःखे व्यक्तिशः भोगावी लागतात त्या फुटकळ, वैयक्तिक नि डोळ्यांसमोर घडणारया दृश्यांच्या उजेडातच मनावर पक्केपणी ठसू शकतात, मनाला धक्का देऊन त्यांची तीव्र जाणीव भासवू लागतात.


निरपराध माणसाचा छळ करू नये, आपला जीव तसा दुसरयाचा मानावा. वाटमारेपणा, दरोडेखोरी, विश्वास दिलेल्याचा केसाने गळा कापणे ही समाजघातक महापापे होत, अमानुष क्रुरता होय. हे तात्विक विवेचन, हे सामान्य नीतिसूत्र वारंवार उपदेशिल्याने मनावर काहीतरी परिणाम होतोच. पण उजाड रस्त्यात चालता चालता एखाद्या लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याची कंठी पाहून त्याच्यावर अकस्मात झडप घालून, त्याचा गळा दाबून ती कंठी काढून उलट त्याच मुलाला सुरयाने भोसकून कुणी राक्षसी मनुष्य पळाला असता त्या रक्तबंबाळ लेकरास पाहताच मनाला जो धक्का बसतो आणि अशा राक्षसी प्रवृत्तीची जी चीड येते त्या नुसत्या सात्विक सूत्राच्या परिणामाहून कितीतरी तीव्रतर असते. त्या घटनेचा किरण थेट हृदयाला चटका देतो, तो क्ष किरणासारखा अंतर्भेदी असतो.


Download Document